पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत लेखाशिर्ष २५१५-१२३८ अंतर्गत एकूण ₹२ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध गावच्या महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या मंजुरीत मंदिर परिसर सुशोभीकरण, रस्ते सुधारणा, सभामंडप बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सार्वजनिक सोयी-सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक निधीचा समावेश आहे. जवळे, कडूस पाबळ, चिंचोली, गांजीभोयरे, तिखोल, कान्हुर पठार, नारायणगव्हाण, पिंपळगाव रोठा, मांडवे खुर्द, शहांजापूर, नांदगाव, अरणगाव, भोयरे खुर्द, भोयरे पठार, हिवरे झरे व वाकोडी गावांमधील विकासकामे या निधीतून हाती घेण्यात येणार आहेत.
या निधीच्या मंजुरीसाठी विशेष सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने यावेळी मनःपूर्वक आभार मानले. मतदारसंघातील सर्व गावांचा संतुलित आणि शाश्वत विकास हेच माझे ध्येय आहे. शासनाच्या माध्यमातून विकासाच्या प्रत्येक शक्य संधीचा लाभ आपल्या मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी मी व माझ्या महायुतीतील सर्व सहकाऱ्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असेही आमदार दाते यांनी यावेळी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने अधिकच्या निधीची भर पडत असल्याने स्थानिक जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासाचे हे नवे पर्व आमदार दाते सर यांच्या प्रयत्नशील व परिणामकारक नेतृत्वाचे प्रतीक ठरले आहे.
पारनेर नगर मतदार संघासाठी रु.२.५० कोटींचा विकासनिधी मंजूर; आमदार काशीनाथ दाते सर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

