सुपा झेडपी गट व जवळा पंचायत समिती गणातून दर्शवली तयारी
पारनेर/प्रतिनिधी,
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने पारनेर तालुक्यात महिला उमेदवारांचा दबदबा राहणार आहे. तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि पाच पंचायत समिती गणांमध्ये महिला आरक्षण निघाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी दत्तात्रय कोठावळे-दिवटे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. सुपा जिल्हा परिषद गट आणि जवळा पंचायत समिती गण या दोन्ही ठिकाणी त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
सुपा जिल्हा परिषद गटात मागास प्रवर्ग महिला आरक्षण आले आहे. राजेश्वरी कोठावळे-दिवटे यांचे सासर सुपा गटातील वाघुंडे बु. येथे असल्याने त्या या गटातून संधी मिळाल्यास उमेदवारी करणार आहेत. दुसरीकडे, जवळा पंचायत समिती गणातही महिला आरक्षण निघाले असून, त्यांचे माहेर जवळा येथे सांगवी सूर्या आहे. जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही ठिकाणी आरक्षण मिळाल्याने त्या उत्साही आहेत. पक्ष संघटनेने संधी दिल्यास दोन्हीपैकी एका ठिकाणी निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
राजेश्वरी कोठावळे-दिवटे या गेल्या दहा वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्या कार्यरत आहेत. खासदार निलेश लंके आणि राणीताई लंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात युवती राष्ट्रवादीची संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे.
महिला सक्षमीकरण हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. महिलांच्या विविध प्रश्नांसाठी त्या गावोगावी जाऊन मदत करतात. कोरोना महामारीच्या काळात खासदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये त्यांनी रुग्णांची सेवा केली. योग साधनेच्या माध्यमातून रुग्णांना मानसिक आधार दिला. या कामात त्या खासदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या.
खासदार लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सर्वसामान्य जनतेची सेवा त्यांनी केली आहे. गरीब, शेतकरी, महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेतला. पक्षाने उमेदवारी दिल्यास महिला आणि मागासवर्गीयांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पारनेर तालुक्यात महिला राजकारणाला नवे बळ मिळणार आहे.
कर्तुत्ववान महिला म्हणून संधी मिळणार !
अतिशय आक्रमक कर्तुत्ववान महिला नेतृत्व म्हणून पारनेर तालुक्यात व जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे-दिवटे यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये संधी मिळणार का तसे झाल्यास पक्षाला एक चांगले महिला नेतृत्व मिळेल.
सुपा माझी कर्मभूमी, जवळा माझी जन्मभूमी; दोन्ही ठिकाणी महिला आरक्षण मिळाले आहे. पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढवून महिलांच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी काम करणार आहे.
– राजेश्वरी कोठावळे-दिवटे, युवती जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

