जिल्हा पदाधिकारी यांची अण्णांसोबत प्राथमिक चर्चा
पारनेर / भगवान गायकवाड,
आदर्श गाव म्हणून जगभर ओळख असलेल्या राळेगण सिद्धी येथे लवकरच अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण नियोजना संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर), प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे, पर्यावरण प्रमुख अरुण कुलट , तालुका सचिव दत्तात्रय औटी या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.
या प्राथमिक चर्चेमध्ये अण्णांनी अभ्यासवर्गासाठी सकारात्मक प्रतिसाद देत शुभेच्छा दिल्याने ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्राहक पंचायतीचा अभ्यासवर्ग राळेगण सिद्धीसारख्या आदर्श गावात आयोजित करण्यामागे एक खास उद्देश आहे. अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये ग्राम विकासासोबतच नैतिक मूल्यांची आणि पारदर्शक कारभार आणि माहिती अधिकाराची मुहूर्तमेढ रोवली आहे, ती ग्राहक प्रबोधन आणि ग्राहक हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक हक्क आणि ग्राहक चळवळ अधिक प्रभावीपणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन घेणार आहेत.
जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी( सर )यांच्या नेतृत्वाखालील ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने नुकतीच समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. अभ्यासवर्गाच्या संकल्पनेबद्दल माहिती देताना औटी सर म्हणाले की, राळेगण सिद्धीच्या पवित्र भूमीतून ग्राहक प्रबोधनाची नवीन दिशा मिळेल. अण्णांनी ग्रामीण भागातील ग्राहक शोषणावर आवाज उठवण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या कार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या भेटीत अण्णांनी अभ्यासवर्गाच्या आयोजनासाठी हिरवा कंदील दाखवल्यामुळे आणि शुभेच्छा दिल्यामुळे आता पुढील नियोजनाला वेग मिळणार आहे.
शाहूराव औटी (सर) यांनी सांगितले की, “अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासवर्ग ग्राहक चळवळीला अधिक बळ देणारा ठरेल. पारदर्शकतेचे आणि नैतिकतेचे महत्त्व ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्यासाठी राळेगण सिद्धी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.” या अभ्यासवर्गात जिल्हाभरातील तसेच मध्य महाराष्ट्र प्रांतातील ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते सहभागी होणार आहे. या निमित्ताने ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते सामाजिक बदलाच्या भूमीत एक नवी ऊर्जा घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या अभ्यासवर्गाच्या तारखा आणि निश्चित स्वरूप लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ग्राहक पंचायतच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

