पारनेर / भगवान गायकवाड,
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस (३१ ऑक्टोबर )रोजी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या संयोजनाने राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडतेचे संदेश देणाऱ्या “एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते.
या एकता दौडमध्ये पारनेर शहरातील सनराइज अकॅडमीचे संचालक संचालक सुनील चौधरी ( सर) यांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
पारनेर पोलीस स्टेशन जवळून या एकता रॅलीला प्रारंभ झाला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच, सनराइज अकॅडमीचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक या दौडमध्ये उत्साहाने धावले. ‘एकता दौड’ दरम्यान सहभागींनी राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडतेचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते. ‘राष्ट्रीय एकता दिना’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती दिली आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या तरुणांनी देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. पारनेर पोलीस स्टेशन, सनराइज अकॅडमीचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



