पारनेर / भगवान गायकवाड,
सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवण्याच्या उद्देशाने स्नेहालय संचलित ‘उडान प्रकल्प’, ‘युवा निर्माण प्रकल्प’, ‘बालभवन प्रकल्प’ आणि एके थिएटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय पथनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेला बालभवनमधील विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्नेहालय युवा निर्माण प्रकल्प कार्यालयात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली, ज्यात तब्बल ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सामाजिक जाणिवांचा आणि नाट्यकलेचा महत्त्वाचा धडा गिरवला.कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. अंशू मुळे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पथनाट्य हे समाजातील अंधश्रद्धा, समस्या आणि रूढी यांवर थेट प्रकाश टाकण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘उडान प्रकल्पा’चे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी प्रभावीपणे केले. यावेळी बालभवनच्या व्यवस्थापक सौ. उषा खोल्लम, तसेच तज्ञ प्रशिक्षक आकाश खंडागळे आणि अक्षय रावसाहेब (शिर्डी) यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय युवा निर्माण प्रकल्प व उडान प्रकल्पातील अनेक कर्मचारीही उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नाट्यकलेच्या महत्त्वपूर्ण घटकांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन व सराव देण्यात आला. यात संवादफेक, आवाजातील चढ-उतार (मॉड्यूलेशन), एक्सप्रेशन्स, आय कॉन्टॅक्ट, प्रभावी शरीर भाषा (बॉडी लँग्वेज) आणि स्टेज प्रेझेन्स यासारख्या मूलभूत गोष्टींवर विशेष भर देण्यात आला. केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता, प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक विषयांवर आधारित जाहिराती व लघुनाट्य तयार करण्याचा प्रत्यक्ष सराव दिला. याद्वारे विद्यार्थ्यांना पथनाट्याची मूलभूत रचना, सादरीकरणाची कला आणि कमी वेळेत मोठा संदेश देण्याची क्षमता समजावून सांगण्यात आली. या व्यावहारिक सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.सायंकाळी झालेल्या समारोप सत्रात स्नेहालयाचे अनिवासी प्रकल्प विभागाचे संचालक हनीफ शेख यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे आणि सादरीकरणाच्या उत्साहाचे विशेष कौतुक केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “पथनाट्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक जनजागृतीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या कलेद्वारे विद्यार्थी समाजातील समस्या, अन्याय आणि ज्वलंत प्रश्न उजेडात आणून सामाजिक बदलासाठी मोठा हातभार लावू शकतात.” त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना ही कला समाजात सकारात्मकता आणण्यासाठी वापरण्याची प्रेरणा दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी जयश्री शिंदे यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक आणि विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले. पथनाट्याच्या या कार्यशाळेचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात झाला, ज्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित झाली.



