Site icon

भाऊबीज निमित्त स्नेहालय संस्थेकडून ‘माहेरची साडी’साठी मदतीचे आवाहन

पारनेर / भगवान गायकवाड,

मागील दोन दशकांच्या यशस्वी परंपरेनुसार यंदाही अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेने वंचित भगिनींसाठी दिवाळीच्या मंगलमय पर्वात ‘माहेरची साडी’ या हृदयस्पर्शी उपक्रमाचे आयोजन केले आहे. दिवाळीच्या सणासुदीला आपल्या आप्तस्वकीयांना भेटवस्तू, फराळाचे पदार्थ आणि मिठाई देण्याची आपली संस्कृती आहे. ज्या माता-भगिनींना भाऊ आणि माहेरचा आधार असतो, त्यांच्यासाठी दिवाळीतील भाऊबीजेचा दिवस अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊ बहिणीला वस्त्र आणि मिठाई देऊन परंपरेचे पालन करतात. मात्र, ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशा वंचित आणि निराधार माता-भगिनींसाठी दीपोत्सव अनेकदा दु:ख आणि निराशेने भरलेला असतो.
अशा निराधार माता-भगिनींच्या जीवनात भाऊबीजेचा आनंद फुलवण्यासाठी अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने २० वर्षांपूर्वी ‘माहेरची साडी’ देण्याचा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमामागे सामाजिक कार्यकर्ते स्व. धर्मराज शंकर औटी गुरुजी यांची प्रेरणा आणि अथक परिश्रम होते. औटी गुरुजी स्वतः गरीब, कष्टकरी आणि वंचित समूहातील महिलांसाठी सहृदयी भाऊ शोधून, त्यांच्याकडून एक-एक नवीन साडी गोळा करण्याचे मोठे कार्य करत असत.
दुर्दैवाने स्व. औटी गुरुजी यांचे निधन झाले असले तरी, त्यांनी सुरू केलेली माहेरच्या साडीची ही अमूल्य परंपरा यापुढेही अखंडपणे चालविण्याचा संकल्प अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू, पुणे या सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक आणि स्नेहालयचे विश्वस्त किरिटी मोरे यांनी केलेला आहे. या उपक्रमातून मिळणारी ‘माहेरची साडी’ ही या माता-भगिनींसाठी केवळ एक नवे वस्त्र नसते, तर ती त्यांच्यासाठी जगण्याची नवी उमेद, सन्मान आणि आशेचा किरण घेऊन येते.
स्नेहालय परिवार आणि अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी-भाऊबीजेच्या निमित्ताने वंचित समूहातील भगिनींसाठी ‘माहेरची साडी’ देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील आपण या भाऊबीजेच्या पवित्र उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन किमान एक ‘माहेरची साडी’ या भगिनींना द्याल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमात सहभागी होऊन वंचित भगिनींच्या जीवनात भाऊबीजेचा गोडवा आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन स्नेहालय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्या एका साडीच्या दानाने या भगिनींना माहेरच्या प्रेमाची आणि भावाच्या स्नेहाची अनुभूती मिळेल.

Advertisement
Share This News On
Exit mobile version