पारनेर / भगवान गायकवाड,
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिपावली साठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या निमित्ताने पारनेर शहरभरातील फटाका स्टॉल धारकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशी माहिती पारनेर फटाका स्टॉल असोसिएशन अध्यक्ष ऋषिकेश गंधाडे यांनी दिली.या फटाका स्टॉल करिता अधिकृत परवानाधारक दिनेश गट,संतोष सोबले , शंकर औटी, मयूर औटी, अमोल दुधाडे, मनिषा जगदाळे, गणेश औटी, वैभव मापारी, सचिन पुजारी, प्रशांत गंधाडे, नामदेव खोसे, सुरेश औटी, राहुल बुगे, जयेश पुजारी आदी आहेत.शहरातील लोणी रोड लगत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान मध्ये तात्पुरते फटाका स्टॉल उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, दुकानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून परवाने मिळाल्यानंतर, विक्रेत्यांनी आता शिवकाशीसह इतर ठिकाणाहून आणलेल्या विविध प्रकारच्या फटाक्यांची मांडणी सुरू केली आहे. यंदा बाजारात ‘ग्रीन’ फटाक्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलबाज्या, अनार, चक्रांपासून ते आवाजी आणि आकर्षक रोषणाई करणाऱ्या फटाक्यांचे बॉक्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टॉलवर अग्निशमन यंत्रणा आणि वाळूच्या बादल्यांची व्यवस्था केली जात आहे. अनेक ठिकाणी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने फटाके विक्रीसाठी निश्चित केलेल्या नियमांचे (उदा. शांतता क्षेत्रापासून अंतर, रात्रीची वेळ मर्यादा) पालन करण्यावर विक्रेत्यांचा भर आहे.
उत्सवाच्या काळात चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा असल्याने स्टॉल धारकांची लगबग वाढली आहे, ज्यामुळे शहरातील बाजारपेठांना दिवाळीची रंगत चढली आहे.

