पारनेर / भगवान गायकवाड,
सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेच्या ‘उमेद प्रकल्पा’तर्फे घरेलू कामगार महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. रहमत सुलतान फाउंडेशन, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र (आय-कार्ड) आणि दिवाळीनिमित्त ‘माहेरची साडी’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे सेवावस्तीतील १०८ एकल, विधवा, घटस्फोटित आणि गरजू महिलांना घरेलू कामगार ओळखपत्र वितरित करण्यात आले. हे ओळखपत्र केवळ एक कागद नसून महिलांच्या अधिकारांचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक असल्याचे मत स्नेहालयच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे यांनी व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, “घरेलू कामगार हा असंघटित कामगार वर्ग असून त्यांना सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना आणि अधिकारांचे संरक्षण मिळाल्यास त्यांना अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळेल.”
या सोहळ्याला स्नेहालयच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे, विश्वस्त राजीव गुजर, बालभवन मानद संचालिका वैशाली चोपडा आणि संचालक हनीफ शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विश्वस्त राजीव गुजर यांनी या शासनाच्या योजनेतून सामाजिक सुरक्षा, विमा योजना, शिक्षण, विवाह सहाय्यता आणि घरगुती कामगारांच्या हक्कांचे संरक्षण मिळणार असल्याचे स्पष्ट करून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. संचालक हनीफ शेख यांनी स्नेहालयच्या ‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बेडसाईट नर्सिंग, बाळंतीण आया व स्वच्छता कौशल्य प्रशिक्षणाची माहिती दिली आणि या तांत्रिक प्रशिक्षणाचा उपयोग करून कष्टकरी महिलांनी आपल्या उपजीविकेत आर्थिक भर वाढवावी असे मार्गदर्शन केले. सखी सेंटरच्या समन्वयक शबाना शेख यांनी महिला व बालविकास विभागाच्या सरकारी योजनांची माहिती दिली.
स्नेहालयचा ‘उमेद प्रकल्प’ हा एकल, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि वंचित महिलांना आर्थिक स्थैर्य व आत्मसन्मान मिळवून देण्याचे ध्येय बाळगून आहे. मागील दहा महिन्यांत या प्रकल्पाने ३०० महिलांचे सर्वेक्षण पूर्ण केले, १२५ महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आणि ५७ महिलांची बँक खाती उघडली. या प्रकल्पाच्या माध्यमातून २४३ घरेलू कामगारांचे फॉर्म कामगार विभागाकडे सादर करण्यात आले असून त्यापैकी ७६ कार्ड वाटप आज करण्यात आले. गोधडी उद्योग सुरू करून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सोहळ्याचा समारोप करताना आयोजकांनी सांगितले की, हा आय-कार्ड वितरण सोहळा केवळ दस्तऐवजांचा कार्यक्रम नसून सशक्तीकरणाचा उत्सव आहे. जिल्हा कामगार कार्यालयाच्या सहकार्याने या महिलांना कार्ड देत दिवाळीच्या निमित्ताने ‘माहेरची साडी’ देणे हा एक भावनिक सन्मानाचा क्षण ठरला. स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पांद्वारे कष्टकरी महिलांसोबत रोजगार आणि आर्थिक उन्नतीसाठी ‘उमेद प्रकल्प’ कार्यरत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यास्मिन शेख यांनी केले, तर प्रतीक्षा साळवे यांनी सूत्रसंचालन केले आणि रुबीना शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कामगार अधिकारी संदीप पालवे, बाल भवन व्यवस्थापक उषा खोल्लम, निलोफर शेख, संतोष बेदरकर, सचिन वाघ आणि बालभवन टीम यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. ‘उमेद प्रकल्पा’चा हा सशक्तीकरणाचा दिवाळी दीप स्त्रीशक्तीच्या उन्नतीचा नवा प्रकाश ठरला आहे.