सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र, वीज व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी भाकपचे पारनेर तहसील कार्यालयासमोर निदर्शने

पारनेर / भगवान गायकवाड,
       भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोयाबीनचे बाजारभाव, विजेचा लपंडाव आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी  पारनेर तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.


शासनाने सोयाबीनसाठी सन २०२५-२६ करिता प्रतिक्विंटल ५,३२८/- रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी, सध्या बाजारात सोयाबीनला केवळ ३,८०० ते ३,९००/- रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन घटले असतानाही व्यापारी १२,००/- रुपये प्रतिक्विंटल मागे शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप भाकपचे पारनेर तालुका सचिव कॉम्रेड संतोष खोडदे यांनी केला.


        ही लूट थांबवण्यासाठी शासनाने तात्काळ हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी निदर्शने करताना केली.
किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबनराव सालके यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, परंतु पंचनामे होऊनही अद्याप मदत मिळालेली नाही, ती तात्काळ मिळावी अशी मागणी केली. कान्हूर पठारचे माजी सरपंच गोकुळ काकडे यांनी भारनियमन आणि अपुऱ्या दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाले असल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी हिंस्त्र श्वापदांचा धोका असल्याने शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा, तसेच बिघाड झालेली रोहित्रे वेळेत बदलून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.


यावेळी बोलताना बबन रावडे यांनी युती सरकारने सत्तेवर आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज कांदा, सोयाबीन, कापूस या नगदी पिकांचे नुकसान होऊनही शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. नुकसान भरपाईसाठी केलेली तरतूद अत्यंत तुटपुंजी असून, ती केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याचा आरोप त्यांनी केला.


तहसील कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार गायत्री सौदाने यांना देण्यात आले. यावेळी किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुभाष ठुबे यांनी पुढील आठवड्यात शासकीय सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र, विजेचा प्रश्न व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई न मिळाल्यास बलिप्रतिपदेच्या दिवशी पारनेर तहसील कार्यालयासमोर ‘मिरची भाकरी आंदोलन’ करण्याचा इशारा दिला.


या आंदोलनात किसान सभेचे तालुका सचिव संपत रावडे, उपाध्यक्ष बापू गायकवाड, पक्षाचे सहसचिव कैलास शेळके, सागर व्यवहारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Share This News On
Exit mobile version