सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबई यांचे मोलाचे सहकार्य
पारनेर / भगवान गायकवाड,
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उद्योग जगतासाठी आणि व्यावसायिक करिअरसाठी तयार करण्याच्या उद्देशाने पारनेर येथील कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास आणि उद्योग सज्जता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
मुंबईच्या नामांकित सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसायनशास्त्र विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. टी. एस. थोपटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व आणि विद्यार्थिनींच्या करिअरमधील त्याची उपयुक्तता यावर प्रकाश टाकला.
सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीच्या मॅनेजर (इंडस्ट्री पार्टनरशिप्स) प्रा. चित्रा भुरखे यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीचे शिक्षण पुरेसे नसून, संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, सांघिक कार्य आणि आधुनिक तांत्रिक ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. भुरखे यांनी रसायनशास्त्र आणि रासायनिक उद्योगांमधील बदलांवर विशेष भर दिला. तसेच, शिक्षण संस्था आणि उद्योगांमधील सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी रोजगाराच्या आणि संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. आहेर यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थिनींना सतत नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती जोपासण्याचा आणि आपल्यातील कुतूहल नेहमी जागृत ठेवण्याचा सल्ला दिला. डॉ. आहेर म्हणाले, “विद्यार्थिनींनी आत्मविश्वास वाढवून या कार्यक्रमातून मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे. स्वतःला उद्योग जगतासाठी तयार करणे, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.”
या उपक्रमाची फलनिष्पत्ती स्पष्ट करताना, महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. जयश्री झावरे हिने आपला अनुभव कथन केला. ती म्हणाली, “या उपक्रमामुळे मला केवळ रसायनशास्त्रातील ज्ञानच नव्हे, तर आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि मुलाखतीची तयारी कशी करावी हे शिकायला मिळाले.” तिच्या वडिलांनी, बाजीराव झावरे यांनीही पालक म्हणून समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “या कार्यक्रमामुळे आमच्या मुलीला व्यक्तिमत्व विकासाची आणि करिअरची योग्य दिशा मिळाली आहे. ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी असे उपक्रम अत्यंत फायदेशीर आहेत.”
या यशस्वी कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दिलीप ठुबे, प्रा. डॉ. राहुल डिग्गीकर, प्रा. भाऊसाहेब नरसाळे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार समन्वयक प्रा. प्रविण डौले यांनी मानले. या उपक्रमाने पारनेर महाविद्यालयातील विद्यार्थिनींना उद्योन्मुख होण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासातून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक मजबूत पाया तयार केला आहे.

