पारनेर / भगवान गायकवाड,
दिवाळी… म्हणजे सर्वत्र दिव्यांची रोषणाई, उत्साह आणि गोडव्याची देवाणघेवाण. मात्र, समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा सण साजरा करणे अनेकदा कठीण होऊन बसते. हीच सामाजिक विवंचना दूर करून माणुसकीचा ओलावा जपण्यासाठी पारनेर येथील पारनेर कॉलेजने एक अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबविला आहे. महाविद्यालयाने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून तब्बल ४२ गरजू आणि कष्टाळू कुटुंबांना ‘दिवाळी सीधा’ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक जबाबदारीचे भान
महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे दिवाळीच्या तोंडावर फराळाचे साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची चिंता असलेल्या कुटुंबांना या उपक्रमाने मोठा आधार दिला आहे. महाविद्यालयाने वितरित केलेल्या ‘दिवाळी सीधा’ किटमध्ये साखर, रवा, बेसन, डाळ, तेल, पोहे यांसारख्या फराळासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूं तसेच इतर किराणा साहित्याचा समावेश होता.
या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाविषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि करुणा रुजवून त्यांना उत्तम नागरिक बनवणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून आम्ही दिवाळी शिध्याचे वाटप केले आहे. दिवाळीचा खरा आनंद वस्तूंच्या खरेदीत नसून, एकमेकांना मदत करण्यात आहे. या गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच आमच्यासाठी सर्वात मोठा दिवाळीचा बोनस आणि समाधान आहे.”
लाभार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू
दिवाळी सीधा स्वीकारताना एका लाभार्थी महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. त्या गहिवरल्या स्वरात म्हणाल्या, “दिवसभर मोलमजुरी करून जेमतेम घर चालतं. या वाढत्या महागाईत दिवाळी साजरी करणं म्हणजे आमच्यासाठी एक स्वप्नच होतं. पण महाविद्यालयाने आमच्यासारख्या दुर्बळ घटकांचा विचार केला. त्यांनी केवळ वस्तू नाही दिल्या, तर आम्हाला दिवाळी शिध्यासोबत जो सन्मान दिला तो आम्ही कधीच विसरणार नाही. आता आमची मुलंही आनंदाने दिवाळी साजरी करतील.” हा केवळ वस्तूंचा वाटप सोहळा नव्हता, तर तो मायेचा आणि आपुलकीचा एक हृदयस्पर्शी आणि भावनिक क्षण होता.
इतरांसाठी आदर्श
महाविद्यालयाच्या या उपक्रमाने केवळ ४२ कुटुंबांची दिवाळीच गोड केली नाही, तर इतर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांसमोर एक उच्च आदर्श निर्माण केला आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पारनेर कॉलेजने ‘सेवेतून समाज घडवणे’ या ब्रीदवाक्याला साजेशी कृती करून समाजातील माणुसकीचे नाते अधिक घट्ट केले आहे.
– विश्वासराव आठरे पाटील,
सचिव, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज

