जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर ) यांची अधिकृत माहिती.
पारनेर / भगवान गायकवाड,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताचा महत्त्वपूर्ण निवासी अभ्यास वर्ग श्री क्षेत्र विघ्नेश्वर देवस्थान, ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे शनिवार दि. २५ आणि रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर) यांनी या माहितीची घोषणा केली.
अभ्यासवर्गाचे उद्घाटन व मार्गदर्शन या दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे उदघाटन कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य विनयकुमार आवटे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभ्यास मंडळ आयाम प्रमुख आणि केंद्रीय सदस्य अरुण देशपांडे भूषवणार आहेत. विशेष मार्गदर्शन सत्रासाठी माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, वीज लोकपाल कार्यालय सचिव दिलीप डुंबरे, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे, प्रांत संपर्क अधिकारी सूर्यकांत पाठक, मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी आणि प्रांत संघटन मंत्री संदीप जंगम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्राहक पंचायतीच्या कार्यात अधिक गती आणण्यासाठी, ग्राहक हक्कांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्यासाठी हा अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यात ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक मार्गदर्शन, तक्रार निवारण आणि पंचायतीचे भावी नियोजन यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा व प्रशिक्षण होण्याची अपेक्षा आहे.
मध्य महाराष्ट्रातील प्रांतातील सर्व कार्यकारणी सदस्य, आयाम प्रमुख, तसेच सर्व जिल्हा, महानगर कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी आणि तालुका स्तरावरील पदाधिकारी यांनी या अभ्यासवर्गासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. या निवासी अभ्यास वर्गामुळे ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

