माजी सरपंच सुमन सैद टाकळी ढोकेश्वर गणात उमेदवारी करण्यास इच्छुक
पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळाल्यास उमेदवारी करणार
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात झेडपी व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. तीन जिल्हा परिषद गटांमध्ये तसेच पाच पंचायत समिती गणांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्याने तालुक्यात यंदा महिलाराजाची निश्चिती होणार आहे. या पार्श्वभूमीवर टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणात अनेक महिला नेत्या उमेदवारीसाठी इच्छुक असून, वासुंदे गावातील माजी सरपंच सुमन सैद यांचे नाव चर्चेत आहे. सैद परिवाराच्या प्रभावामुळे त्यांची उमेदवारी गणातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता आहे.
वासुंदे हे गाव पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील राजकीयदृष्ट्या अति संवेदनशील व महत्त्वपूर्ण मानले जाते. सुमन सैद या या गावाच्या माजी सरपंच म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. सैद परिवार हा परिसरातील एक मोठा व प्रभावशाली परिवार आहे. स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या गटातील विचारसरणीला मानणारा हा परिवार आहे. झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजकीय वारसा सैद कुटुंबीयांनी जपला आहे. सुमन सैद यांचे पती हे परिसरातील प्रगतिशील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगा ऍड. सचिन सैद हा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा पारनेर तालुकाध्यक्ष म्हणून सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय, सहकार व उद्योग क्षेत्रात सैद परिवाराचे मोठे योगदान आहे.
टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणात सैद परिवाराचा मोठा नातलग वर्ग व मित्रपरिवार आहे. ऍड. सचिन सैद यांचा खडकवाडी, कामटवाडी, वारणवाडी, देसवडे, पळशी या गावांमध्ये प्रभावशाली मित्रमंडळ व नातेवाईकांचा पाठबळ आहे. ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये नातेवाईक, मित्रपरिवार व स्थानिक प्रभाव यांचा निर्णायक रोल असतो. त्यामुळे माजी सरपंच सुमन सैद यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विजयाची खात्री आहे, असा विश्वास स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
महिला आरक्षणामुळे तालुक्यात नव्या नेतृत्वाला संधी मिळणार असून, सुमन सैद यांची उमेदवारी ही गणातील राजकीय गणित बदलू शकते. सुजितराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून सुमन सैद पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येतील, असा दावा समर्थक करत आहेत. सैद परिवाराच्या सामाजिक व राजकीय प्रभावामुळे टाकळी ढोकेश्वर गणातील निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाची निवडणूक महिलांच्या नेतृत्वाची नवी पिढी घडवणारी ठरेल, अशी चर्चा आहे.

