पारनेर / भगवान गायकवाड,
पोखरी (ता. पारनेर )येथे आयोजित केलेल्या पोखरी प्रीमियर लीग च्या पहिल्या पर्वाचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि यामध्ये सचिन पवार यांच्या मालकीच्या ‘स्वराज फायटर्स’ संघाने विजेतेपदाचा मान पटकावला. त्यांनी सुधाकर शिंदे यांच्या मालकीच्या जीएमसी वॉरियर्स’ संघावर मात करून स्पर्धेचे पहिले विजेते ठरण्याची किमया साधली.
पीपीलचे यशस्वी पहिले पर्व
पोखरी येथील क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरलेल्या या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा मुख्य हेतू केवळ क्रिकेटचा थरार नव्हे, तर जुन्या पिढीतील आणि नवीन पिढीतील खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील एकोपा टिकवून ठेवणे हा होता. विविध संघमालकांनी आपल्या टीममध्ये जुन्या-नव्या खेळाडूंना संधी दिली, ज्यामुळे संपूर्ण स्पर्धेत अनेक उत्कंठावर्धक सामने पहायला मिळाले आणि प्रेक्षकांनीही खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.अंतिम सामन्यात ‘स्वराज फायटर्स’ संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत जीएमसी वॉरियर्स’ संघाला पराभूत केले. ‘स्वराज फायटर्स’ संघ विजेता ठरला, तर जीएमसी वॉरियर्स’ संघ उपविजेता ठरला. उद्धव नामदेव शिंदे आणि दत्ता गणपत शिंदे यांच्या मालकीचा ‘सनराईझर्स पोखरी’ संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला, तर पप्पू भास्कर करंजेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘एस. के. फायटर्स’ संघाने चौथे स्थान पटकावले.स्पर्धेमध्ये खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या ‘स्वराज फायटर्स’ संघाला आकर्षक बक्षीस मिळाले, तर उपविजेत्या ‘JMC वॉरियर्स’ संघालाही योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघांमध्ये पोखरी किंग्ज, मंगलमूर्ती इलेव्हन, डी. बी. पवार अँड कंपनी, रंगदास स्वामी प्रतिष्ठान, खंडेश्वर योध्दा, रिद्धी फायटर्स, समर्थ रेंटल्स आणि साईऋषी सुपर किंग्ज यांचा समावेश होता.या भव्य आणि यशस्वी स्पर्धेचे आयोजन सुनील डेरे, विकास शिवले, शिवम पवार, योगेश शिंदे, अक्षय पवार, ओंकार खैरे, केतन खैरे, सिद्धेश खैरे, यश डेरे, सादिक शेख, कुणाल पवार, महेश खैरे, संकेत फरतारे, तसेच पोखरी ग्रामस्थ आणि तरुण सहकाऱ्यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच पोखरी प्रीमियर लीगचे पहिले पर्व अत्यंत दिमाखदारपणे पार पडले. या स्पर्धेमुळे पोखरी गावात खेळाला आणि खिलाडूवृत्तीला नवीन प्रोत्साहन मिळाले आहे.

