Site icon

पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण”पुरस्कार

हिंदू – मुस्लिम ऐक्यसाठी डॉ.सय्यद यांचे समाज प्रबोधन

पारनेर / भगवान गायकवाड,


     हिंदू -मुस्लिम ऐक्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले व मुस्लिम पंथाचे असुनही वारकरी संप्रदायाचे साधक पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ रफिक सय्यद यांना “वारकरी भूषण पुरस्कार”प्रदान करण्यात आला आहे.जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गितांजली शेळके यांच्या हस्ते रविवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
  धर्माने मुस्लिम असुनही राम – रहीम एक आहे असे म्हणत पंढरपूरच्या वारीत सहभागी होवुन तुकोबांच्या अभंगांचे दाखले देत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद पारनेरकर यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी मुख्याध्यापिका श्रद्धा रोहोकले लिखित भारतीय वीरांगणा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.दरोडी गावचे सुपुत्र व सध्या मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किसनराव पावडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत समाजात आदर्श काम करत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
    यावेळी महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजलीताई शेळके यांनी मनसंधारणातून जलसंधारण करता येते हे सांगताना त्यांनी पिंपरी जलसेन कसे पाणीदार केले याचे उदाहरण दिले. पालकत्वाची एबीसीडी त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांनी गावखेड्यातील माणूस कसा बदलत गेला. माणसांच्या नात्यांची वीण कशी उसवली गेली यासंदर्भात कविता सादर केली. पूर्वाश्रमीचे शिक्षक आणि सध्या ठाणे येथे डीसीपी म्हणून कार्यरत असलेले गणेश गावडे यांनी सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांची भूमिका कशी असावी हे सोदाहरण पटवून दिले. लोकमत वृत्तसमूहाचे विजय झिमूर आणि सकाळ वृत्तसमूहाच्या अमृता देसरडा यांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. भारतीय विरांगणा या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती श्रद्धा रोहोकले यांनी आपल्या मनोगतातून जिजाऊ – सावित्री या नारीशक्तीचा उल्लेख करत वाचनचळवळ कशी वृद्धिंगत होईल याविषयी मांडणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन माणुसकीचे मारुती शेरकर यांनी केले आणि आभार सेकंडरी बँकेचे संचालक श्री भाऊसाहेब आहेर यांनी केले.

Advertisement
Share This News On
Exit mobile version