पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यात राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मोठा वेग पाहायला मिळतो आहे. शेतकरी, कामगार, तरुण, महिला व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि गरजा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली धडपड सातत्याने पहावयास मिळत आहे. “प्रत्येक निवडणूकीत अनेक इच्छुक असतात, मात्र जनता ज्याला कौल देईल त्यालाच महायुतीची उमेदवारी दिली जाईल. जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडविणाराच नेता होऊ शकतो, पदावर बसलेला नाही” या त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात मांडलेल्या ठाम भूमिकेमुळे आगामी काळात पारनेर तालुक्यातील जनतेशी असलेले विखे कुटंबाचे गेल्या तिन पिढ्यांपासुनचे नाते अधिक दृढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी पारनेर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. विखे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील विकास कामांचे भुमिपूजन तसेच तालुक्यातील महायुती कार्यकत्यांच्या मेळाव्यात डॉ. विखे हे बोलत होते. आमदार काशिनाथ दाते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अशोक सावंत, विश्वनाथ कोरडे, विनायक देशमुख, राहुल शिंदे, अश्विनी थोरात, विक्रमसिंह कळमकर, विजय औटी, अशोक चेडे, युवराज पठारे, सुषमा रावडे, संदीप ठुबे, कल्याण काळे, सुधामती कवाद उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुजय विखे यांनी सांगितले की, आज व्यासपीठावर जे आहेत ते जानेवारीमध्ये एकत्र असतील हे सांगता येत नाहीत. हे सगळे एकत्र आले म्हणून आपण विधानसभेत विजय संपादन करू शकलो. हा विजय तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकत्यांचा आहे. प्रत्येक माणसाने परिवर्तनाचा निर्धार केला होता. विखे पाटलांच्या पराभवाचा बदला घेण्याच्या भावनेतून प्रत्येक जण पळाला त्यामुळे हा विजय साकारला गेला. एका विचाराच्या विरोधात हे परिवर्तन झाले. कोणी म्हणत असेल की हे माझ्यामुळे झाले तर तो मूर्ख असेल. ज्यावेळी कार्यकर्ते आंतर्मनातून पळतात त्यावेळी नेता तयार होतो. त्यामुळे व्यासपीठावरील कोणालाही मी विचारत नाही. जे खाली बसले त्यांना नेहमी विचारतो अशी भूमिका स्पष्टपणे मांडली.
पुढे बोलताना डॉ सुजय विखे यांनी सोबत राहुन गद्दारी करणाऱ्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेत महायुतीच्या अभेद्यतेसाठी तुर्तास मोलाचे मार्गदर्शन करत शेतकरी व सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणे हेच विखे कुटुंबाच्या राजकारणातील यशाचे गमक अुसुन जनतेच्या विश्वासावरच विखे कुटुंबाने आजवर काम केले आणि यापुढेही करत राहणार असल्याचे सांगितले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात तालुक्यातील अनेक पाणी प्रकल्पांना गती देण्याचे काम होणार असून आगामी काळात प्रत्येक गावाला शाश्वत पाणी मिळावे, कोरडवाहू भागातील शेतीला उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी मिळावे या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी केंद्र व राज्यातून मोठा निधी आणला जात आहे. तसेच रस्ते विकास, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या योजना राबवून पारनेर तालुक्याचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
एकंदरीत पारनेर तालुक्यातील विकासाचा ध्यास घेतलेल्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची कार्यशैली आजच्या त्यांच्या वक्तव्यातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी जनतेशी जोडलेले नाते हेच त्यांचे राजकारणाचे बळ ठरणार असुन येत्या काळात त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.
पारनेर शहराने लोकसभेला, विधानसभेला महायुतीला मताधिक्य दिले. नगरपंचायतीची सत्ता विरोधात असताना सर्वसामान्य जनता मात्र सातत्याने आपल्या पाठीशी उभी राहीली आहे. वैयक्तिक योजनांमुळे निधीची चणचण असल्याने अजित पवार यांनी नवीन आमदार म्हणून नगरविकास खात्यातून पारनेर शहरासाठी ६ कोटी ५० लाख रूपयांचा निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभार. विधानसभा निवडणुकीप्रमाणे यापुढील काळात महायुती अभेद्य राहण्यासाठी आपसातील मतभेद दूर करणे गरजेचे आहे. व्यासपीठावरील सर्व एकसंघ राहीले तर कोणतीही निवडणूक जिंकणे अशक्य नाही. महायुतीचे घेतलेले निर्णय सर्वांनी मान्य केले पाहिजेत.
– आमदार काशिनाथ दाते सर