पारनेर / भगवान गायकवाड,
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे . या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाचे वतीने पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाजबांधव मुंबईला दाखल झालेले आहेत. जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी त्याग केलेला आहे. त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. जर जरांगे पाटील यांच्या जीवीतास काही बरेवाईट झाले तर सरकारला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे या निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनांमध्ये आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वाहने खाद्यपदार्थ, सुकामेवा, पाणी बॉटल घेऊन मुंबईला जात आहेत. पारनेर तालुक्यातूनही पारनेर शहर, सुपा, भाळवणी, कान्हूरपठार, हिवरेकोरडा, वडगावआमली, अळकुटी, निघोज, वडझिरे, म्हसोबा झाप या गावांतून प्रत्येकी २ गाडया खादयपदार्थ मुंबईकडे रवाना झालेले आहेत.
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनास पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले . जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून तोडगा न निघल्यास तालुक्यातील सुपा येथील चौकात शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे.