कु. तन्वी सरोदे, कु. सायली बरकडे, कु. प्रसाद नऱ्हे यशाचे मानकरी
पारनेर/प्रतिनिधी,
भाळवणी येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वडगाव सावताळच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गावाचा व शाळांचा नावलौकिक वाढवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी कु. तन्वी दत्तात्रय सरोदे हिने तालुक्यात प्रथम स्थान पटकावले. तसेच, मेहेर बाबा माध्यमिक विद्यालयातील कु. सायली कोंडीभाऊ बरकडे हिने लहान गटात तालुक्यात प्रथम, तर कु. प्रसाद दादाभाऊ नऱ्हे याने दुसरे स्थान मिळवले. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. कु. सायली बरकडे व कु. तन्वी सरोदे या दोन्हीही खेळाडू विद्यार्थिनींची तालुकास्तरावरील चमकदार कामगिरीनंतर जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मेहेर बाबा माध्यमिक विद्यालय, वडगाव सावताळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. गावचे सरपंच संजय रोकडे, व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खंडाळे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. वडगाव सावताळसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने गाव आणि शाळांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आणि शाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातही हे विद्यार्थी असेच यश मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी वडगाव सावताळ येथील ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी मेहेर बाबा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी केली त्यांच्या यशामध्ये सर्व शिक्षक पालक यांचे मोठे योगदान राहिले आहे या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
– गणेश खंडाळे (अध्यक्ष : शालेय व्यवस्थापन समिती वडगाव सावताळ)