पारनेर / भगवान गायकवाड,
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशानंतर सकल मराठा समाज गावागावात युवा मेळावे आयोजित करणार आहे. या मेळाव्यांद्वारे युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे युवा नेते वकील गणेश कावरे आणि निलेश खोडदे यांनी दिली.
मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या यशस्वी आंदोलनानंतर पारनेर येथे आयोजित विजयोत्सव सभेत ते बोलत होते. यावेळी कावरे आणि खोडदे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पारनेरमधील सर्व समाजघटकांनी खाद्यपदार्थ देऊन पाठिंबा दिला. यातून पारनेरच्या सामाजिक एकतेचा आदर्श संपूर्ण राज्याला दिसला.” या आंदोलनात दत्तात्रय अंबुले, चंद्रकांत कावरे, संभाजी मगर, बाळासाहेब मते, आर.डी. औटी, गणेश कावरे, निलेश खोडदे, बाळासाहेब शेटे, सतीश म्हस्के, शत्रुघ्न नवघणे, धीरज महांडुळे, तेजस औटी, अक्षय चेडे, रोहन चेडे, राजेंद्र तराळ यांच्यासह तालुक्यातील अनेक युवक सहभागी झाले होते.
आता या युवकांना ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन विविध योजनांची माहिती देण्यासाठी गावागावात मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पारनेरकरांनी सामाजिक एकतेचा आदर्श दाखवला
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आंदोलनात सहभागी असणाऱ्याना खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी आवाहन केले वर मराठा सह शहरातील सर्व जाती धर्माचे लोकांनी खाद्यपदार्थ आणुन दिले. मुंबई ला हे खाद्यपदार्थ घेऊन जाताना पारनेर मधील सामाजिक एकतेचे आदर्श दर्शन पारनेर करांनी राज्यात घडवले ही पारनेर करांच्या अभिमानाची बाब आहे
– निलेश खोडदे, गणेश कावरे