पारनेर / प्रतिनिधी,
नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नगर शिरूर हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ठिकठिकाणी अनाधिकृत डिव्हायडर फोडलेले आहेत. कुठल्याही चौकामध्ये गावचे दिशादर्शक फलक नाही. रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड इस्टिमेट मध्ये असतानाही कुठेही वृक्ष लागवड झालेली नाही. रात्री रस्त्यावर गाड्या चालवताना साईड पांढरा साईट पट्टा नसल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही व अपघात होऊन मनुष्य हानी होते. रस्त्यावर लेअर देणे गरजेचे असतानाही तरीही रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे लेअर दिले जात नाही. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर सुपा टोल नाक्यावर कुठलीही इमर्जन्सी सुविधा उपलब्ध नाही. ॲम्बुलन्स, क्रेन, जेसीबी ही कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सुपा टोल नाका व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची रस्त्यावर सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. याविरोधात कामगार नेते रविश रासकर यांनी मंगळवार दि.९ सप्टेंबर पासून सुपा येथील म्हसणे फाटा टोल नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्याप टोलनाका किंवा कंपनी व्यवस्थापन या उपोषणाकडे फिरकले नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यावेळी रविश रासकर म्हणाले की, शिरूर नगर रस्ता हा पूर्णतः निकृष्ट झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुपा टोलनाका हा बंद करण्यात यावा. वाहन चालकांसह गोरगरीब सामान्य जनतेची लूट थांबवावी. जोपर्यंत रस्त्याचे इस्टिमेंट नुसार काम होत नाही तोपर्यंत टोल नाका हा बंद ठेवावा तसे न केल्यास उपोषण चालूच राहील. अद्यापही सुपा टोलनाका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथील एकही पदाधिकारी फिरकले नाहीत. महामार्गावर रात्री उपोषण कर्त्यांच्या जीवितास धोका आहे. उपोषणकर्त्याला काही झाल्यास त्याला सर्वस्वी टोलनाका व्यवस्थापन जबाबदार राहील असेही रासकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी प्रविण दळवी, संतोष गाडीलकर, तेजस गायकवाड, यश मिसाळ, शुभम भागवत, सतिष तरटे, प्रविण ठोकळ आदी यावेळी उपस्थित होते.