टाकळी ढोकेश्वर गटातील बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रवींद्र राजदेव यांची संकल्पना
पारनेर/प्रतिनिधी :
निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सामाजिक उपक्रमांचा वसा सातत्याने जोपासला जात आहे. याच उपक्रमांचा भाग म्हणून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग प्रमाणपत्रांचे नूतनीकरण आणि नवीन प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवार, दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून होणार आहे.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकासह मोबाइल आणणे आवश्यक आहे. रवींद्र राजदेव यांनी सर्व दिव्यांग बांधवांना वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
निलेश लंके प्रतिष्ठान नेहमीच आरोग्य शिबिरे, शिक्षण, आणि सामाजिक कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत असते. या शिबिरामुळे दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होणार असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल. या उपक्रमासाठी स्थानिक प्रशासन आणि सिव्हिल हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे. सर्वांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे.