सिव्हिल हॉस्पिटलमधील आंदोलनानंतर दिव्यांगांना न्याय
डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रविंद्र राजदेव यांचे आंदोलन; खासदार लंके यांच्या हस्तक्षेपाने कॅम्प पूर्ण.
पारनेर/प्रतिनिधी :
निलेश लंके प्रतिष्ठान आणि निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून बुधवारी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोफत प्रमाणपत्र वाटप आणि नूतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला पारनेर तालुक्यातील 450 आणि लोकसभा मतदारसंघातील 900, असे एकूण 1450 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. यावेळी रविंद्र राजदेव, सुनील करंजुले, ॲड. उज्वला घोडके, पोपट गुंड, बाळासाहेब दिवेकर, संजय गुंड, सयाजी भाईक, विशाल गागरे, भानुदास आग्रे, माधव आग्रे, मारुती आग्रे, जनार्दन चौधरी, भाऊसाहेब चौधरी, सुनील चौधरी, अनिल आहेर, संदेश आहेर, वैभव आग्रे, प्रणव पानसरे, कैलास राजदेव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कॅम्पदरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. तांदळे आणि डॉ. तांबोळी हे निघून गेल्याने उपस्थित दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी पसरली. यामुळे निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले. याची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि रविंद्र राजदेव यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. त्यानंतर कॅम्प पुन्हा सुरू झाला, आणि सर्व दिव्यांग बांधवांना मोफत प्रमाणपत्रांचे वाटप यशस्वीपणे करण्यात आले.
या कॅम्पमुळे अनेक दिव्यांग बांधवांना त्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण आणि नवीन प्रमाणपत्र मिळाले, ज्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. रविंद्र राजदेव यांच्या पुढाकाराने आणि निलेश लंके यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.

