Site icon

कुठल्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी काळानुसार बदल आवश्यक : आमदार दाते

पारनेर एस.टी.आगारमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा पाच नवीन एस टी बस दाखल


पारनेर / भगवान गायकवाड,

कुठल्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी काळानुसार बदल करणे आवश्यक असून प्रवाशांच्या काळानुरूप बदललेल्या गरजा लक्षात घेता प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे मत पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी काल मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या मतदारसंघातील पारनेर आगार (एस.टी.डेपो) साठी मंजूर असलेल्या एकूण दहा एस टी बसेसपैकी उर्वरित पाच एस्.टी.बसेसच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपाचे मंडलाध्यक्ष राहुल शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, राष्ट्रवादी महीला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, उद्योजक दिलीप दाते, नगरसेवक अशोक चेडे, नगरसेवक पै. युवराज पठारे, दत्तानाना पवार, लहु भालेकर, विकास रोकडे, मनोज मुंगसे, लहानू रावडे, सुनिल सोबले यांसह डेपो  मॅनेजर प्रशांत काळे, एस टी महामंडळ अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिक प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार दाते यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या मागणी विरहीत विविध क्षेत्रात होत असलेला बदल अनेकांच्या नजरेत भरत असून कायमस्वरूपी प्रगतीकडे जाणारा मतदारसंघ घडविण्याच्या दृष्टीने सर्वच क्षेत्रात प्रगती होणे आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात झालेला बदल किंवा प्रगती ही कधीही सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरू शकत नाही. सामाजिक वा सामुहिक क्रांतीसाठी एका विशिष्ट व्हिजनची निश्चिती करत सर्वांगीण विकास करणे आवश्यक असून प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर दिला जात असलेला भर हा त्याचाच एक भाग आहे.

तालुक्यातील जनतेला महामंडळ प्रशासनाच्या मार्फत सुविधा पुरविण्यासोबतच आमदार दाते यांनी तालुक्यातील नागरिकांना एस टी बसच्या प्रवासाचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

Advertisement
Share This News On
Exit mobile version