“पारनेरवर बिबट्यांचे संकट: आमदार दातेंचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन”

पारनेर / भगवान गायकवाड,

पारनेर तालुक्यात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे खळबळ उडाली आहे. एका चिमुकल्याचा आणि एका तरुणाचा मृत्यू, तसेच आणखी एका तरुणाच्या जखमी होण्याच्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. या दु:खद घटनांनंतर आमदार काशिनाथ दाते यांनी शोक व्यक्त करत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



आमदार दाते यांनी सांगितले की, पीडित कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही केवळ आधाराचा हात आहे, परंतु त्यांच्या दु:खाची आणि नुकसानीची भरपाई होऊ शकत नाही. ते म्हणाले, “मी नेहमीच या कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.” वनविभागाशी सातत्याने संवाद साधून बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.


वाघ हा राष्ट्रीय प्राणी असल्याने त्यांचा बिमोड करता येत नाही, परंतु नागरिकांचे जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे दाते यांनी स्पष्ट केले. त्यांनी नागरिकांना संध्याकाळनंतर आणि पहाटे एकटे बाहेर न पडण्याचे, लहान मुलांना एकटे न सोडण्याचे, तसेच घराजवळील ओसाड जागा, झुडपं आणि ओढ्यालगतची ठिकाणं स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. गुरं-ढोरांना सुरक्षित ठिकाणी बांधण्यासह, बिबट्याची हालचाल दिसल्यास त्वरित वनविभाग आणि गावकऱ्यांना कळवण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

“आपलं गाव आणि तालुका हे एक कुटुंब आहे. या कुटुंबातील कुणीही संकटात सापडायला नको,” अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करत आमदार दाते यांनी सर्वांना सावध राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वनविभाग आणि प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनी खबरदारी घेतल्यास या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Share This News On
Exit mobile version