पारनेर/प्रतिनिधी :
निघोज येथील अण्णाभाऊ साठे नगर व भीमनगर या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत होता. विशेषतः महिलांना घरगुती वापरासाठी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपनलिका (बोरवेल) मंजूर करून घेतली. या कुपनलिकेचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यातून मुबलक पाणी लागले. यामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्या डोक्यावरील हंड्याचा भार हलका झाला आहे.
कुपनलिकेच्या पूजन सोहळ्यास अल्पसंख्याक समाजाचे नेते असलमभाई इनामदार, ग्रामपंचायत सदस्य भावना सतीश साळवे, बबन बोरगे, पोपट साळवे, हिरामण साळवे, चंद्रकांत बोरगे, साहिल कसबे, वैभव साळवे, विकी साळवे, शुभम साळवे, महादेव मेहेर, पुष्पा साळवे, जयश्री साळवे, नंदा साळवे, कमल साळवे, जायभाई कांबळे यांच्यासह अण्णाभाऊ साठे नगर आणि निघोज येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या यशस्वी प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः महिलांनी सचिन पाटील वराळ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
अण्णाभाऊ साठे नगर व भीम नगरातील पाणीटंचाईचा प्रश्न पाहून मन विषण्ण झाले होते. महिलांना पाण्यासाठी होणारी तारांबळ असह्य होती. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने कुपनलिका मंजूर करून हा प्रश्न सोडवण्यात यश आले. ग्रामस्थांचा आनंद आणि महिलांचे समाधान पाहून मला समाधान वाटते. भविष्यातही अशा सामाजिक कार्यासाठी मी कटिबद्ध राहीन.
या प्रयत्नांमुळे अण्णाभाऊ साठे नगरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.– सचिन पाटील वराळ (निघोज जिल्हा परिषद गटाचे नेते)

