शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान, मदतीची मागणी
समाजिक कार्यकर्ते बजरंग गागरे यांचे प्रशासनाला निवेदन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील उत्तर खडकवाडी, पळशी, पोखरी, म्हसोबा झाप, वडगाव सावताळ, वासुंदे, आणि टाकळी ढोकेश्वर या भागांत यंदा अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात कांदा, बाजरी, मिरची, वटाणा, काकडी आणि फूलशेती यासारखी पिके घेतली जातात. परंतु, सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले असून, पिकांचा पूर्णपणे नाश झाला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई आणि शासकीय मदत मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते बजरंग गागरे आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी पारनेर येथील कृषी विभागाला निवेदन दिले आहे. त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने कांदा, बाजरी, मिरची यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासकीय मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. असे मत सामाजिक कार्यकर्ते बजरंग गागरे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बबन रोकडे, ढोकळे गुरुजी, युवा नेते विशाल गागरे आदी उपस्थित होते. प्रशासन या मागणीला कसा प्रतिसाद देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

