Site icon

त्याग, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक : ॲड. बागेश्री जरंडीकर

अहिल्यानगर दि.२३ प्रतिनिधी ( भगवान गायकवाड)

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. हा उत्सव केवळ धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून समाजातील स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या त्यागाचा, धैर्याचा आणि समाजासाठी केलेल्या अनमोल योगदानाचा साजरा करणारा पर्व आहे. आई, बहीण, पत्नी, शिक्षिका, डॉक्टर, वकील, पोलीस—स्त्री कोणतीही भूमिका पार पाडली, तरी तिच्या कार्यामुळेच समाज सुरक्षित, संवेदनशील आणि प्रगत राहतो.

याच स्त्रीशक्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे ॲड. बागेश्री जरंडीकर.

*न्यायासाठी अखंड लढा*
१९८८ पासून अहमदनगर जिल्हा तसेच मुंबई आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात वकिली करताना त्यांनी असंख्य कठीण प्रकरणांत न्याय मिळवून दिला. २००७ मध्ये भारत सरकारकडून त्यांची नोटरी म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर २०१८ पासून महिला व बालविकास विभागांतर्गत बालकल्याण समिती सदस्य म्हणून काम करताना त्यांनी बालकांचे हक्क जपण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दोनशेहून अधिक POCSO प्रकरणांत पीडित बालकांसोबत काम करून त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

*बालविवाहाविरुद्ध ठाम भूमिका*
कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक वाढले. तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली “उडान” उपक्रम सुरू केला.

तात्काळ हस्तक्षेप करून २४५ पेक्षा जास्त बालविवाह थांबवले.

न ऐकणाऱ्या पालकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा २०१५ अंतर्गत १७ गुन्हे दाखल केले, जे महाराष्ट्रातील सर्वाधिक नोंदी आहेत.

गावोगावी ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करून व्यापक जनजागृती केली.

वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलींच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनावर भर दिला.

*बालकामगार मुक्तीची धडपड*
अहमदनगर जिल्ह्यातील बालकामगार समस्येवरही त्यांनी त्वरित पावले उचलली.

चाईल्ड लाईनच्या सहयोगाने अनेक धाडसी हस्तक्षेप करून मुलांना बालकामगार प्रथे मधून मुक्त केले.

मागील ५ वर्षांत साधारण ६० बालकांची सुटका करून त्यांना शिक्षण आणि पुनर्वसनाची नवी दिशा दिली.

*दत्तक विधान केंद्रातील संवेदनशीलता*
अनाथ, निराधार आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी त्यांनी विशेष कार्य केले.

बालसंगोपन योजनेअंतर्गत ६९०० पेक्षा जास्त बालकांना न्याय व आर्थिक लाभ मिळवून दिला.

सोडून दिलेली व सापडलेली मुले, तसेच कुमारी मातांची ४३९ नवजात बालके कायदेशीर दत्तक मुक्त घोषित करून त्यांना चांगल्या कुटुंबात पुनर्वसित केले.

दत्तक विधान केंद्रात पालकांना कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन करून, त्यांच्या आयुष्याला नवी भरारी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

त्यांच्या संवेदनशील आचरणामुळे शोषित व पीडित बालके निर्भयपणे त्यांच्याजवळ भावना व्यक्त करू शकत होते, जे त्यांच्या मानवी दृष्टिकोनाचे द्योतक आहे.

🌸 *समाजसेवेतील सातत्य*
सध्या ॲड. बागेश्री जरंडीकर स्नेहालयाच्या “उडान प्रकल्पात” मानद संचालक म्हणून कार्यरत आहेत. ५९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि ऊर्जा प्रेरणादायी आहे. बालकांचे हक्क, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि समाजात सकारात्मक परिवर्तन यासाठी त्यांचा प्रत्येक निर्णय आणि मार्गदर्शन समाजासाठी दिशादर्शक ठरतो.

ॲड. बागेश्री जरंडीकर यांचा जीवनप्रवास दाखवतो की—

स्त्रीशक्ती केवळ घरापुरती मर्यादित नसून ती समाज बदलविण्याची क्षमता ठेवते.

त्याग, धैर्य आणि समर्पण असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते.

समाजसेवेच्या वाटचालीत वय, अडचणी वा अडथळे कधीच अडथळा बनत नाहीत.

*“स्त्रीच्या त्यागामुळे समाज उजळतो; तिच्या धैर्याने संकटे नाहीशी होतात आणि तिच्या कार्याने अनेकांना नवजीवन मिळते.”*

✍️ लेखक:
प्रविण कदम
उडान प्रकल्प व्यवस्थापक, स्नेहालय अहिल्यानगर
📞 9011026495

Advertisement
Share This News On
Exit mobile version