अहिल्यानगर / प्रतिनिधी,
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन पारनेर तालुक्यातील तातडीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या पाच विषयांवर त्यांनी ठोस मागण्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.
अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट पंचनामे…
मुसळधार पावसामुळे पारनेर-नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. झावरे पाटील यांनी कोणतेही निकष न लावता सरसकट शेती पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
बैलगाडा शर्यतीसाठी प्रांताधिकाऱ्यांना परवानगी अधिकार….
बैलगाडा शर्यतीच्या आयोजनातील अडचणी दूर करण्यासाठी परवानगीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी प्रांताधिकाऱ्यांना देण्याची मागणी झावरे पाटील यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रांताधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या, ज्यामुळे बैलगाडा चालक-मालक संघटनेची कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
रोजगार हमीची स्थगित कामे पुन्हा सुरू…
पारनेर-नगर तालुक्यातील मंजूर सिमेंट रस्त्यांची कामे शासनाने स्थगित केली होती. ही कामे दिवाळीनंतर सुरू करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मजुरांना रोजगार मिळावा यासाठी झावरे पाटील यांनी तातडीने काम सुरू करण्याचा आग्रह धरला.
आधार केंद्राला मंजुरी…
टाकळी ढोकेश्वर आणि ढवळपुरी परिसरातील विद्यार्थ्यांना आधार लिंकसाठी होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेता, येथे आधार केंद्र सुरू करण्याची मागणी झावरे पाटील यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
वासुंदेला राष्ट्रीयकृत बँक….
वासुंदे येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने स्थानिकांना होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून राष्ट्रीयकृत बँक मंजूर करण्याची मागणी झावरे पाटील यांनी केली. ही मागणी बँक समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पारनेर तालुक्यातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल.

