पारनेर / भगवान गायकवाड,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अॕण्ड सायन्स कॉलेज, पारनेर येथे विद्यार्थीनींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला दहा दिवसीय ‘ब्युटी पार्लर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या अभ्यासक्रमात पारनेर शहरातील ‘सौंदर्य ब्युटी अकॅडमी’च्या प्रसिद्ध प्रशिक्षिका आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ. राजश्री भिसे यांनी मार्गदर्शन केले. दहा दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थिनींना मेकअपसाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रोडक्ट्सची ओळख, स्कीन टोननुसार शेड्सची निवड, तब्बल १५ प्रकारच्या हेअर स्टाईल, २१ प्रकारच्या साड्या नेसण्याच्या पद्धती, नेल आर्ट, नो-लूक मेकअप, वॅक्सिंग, ब्लीच, मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर यांसारख्या अनेक घटकांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
अभ्यासक्रमाचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, प्रशिक्षिका सौ. राजश्री भिसे आणि महिला सक्षमीकरण कक्ष समन्वयक डॉ. सरिता कुंडलीकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी म्हणाल्या, महाविद्यालयाने अत्यंत कमी शुल्कात हा कोर्स उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. या प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्यामुळे आम्ही आमचे शिक्षण स्वतःच्या कमाईतून पूर्ण करू शकतो.
प्रशिक्षिका सौ. राजश्री भिसे महाविद्यालयाचे कौतुक करताना म्हणाल्या, मी या कॉलेजची माजी विद्यार्थीनी आहे. आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर देत आले आहे, याचा मला अभिमान वाटतो.
प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना पाणी पाणी विद्यार्थिनींना आश्वासित केले की, “महाविद्यालयात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यापुढेही ब्युटी पार्लरमधील बेसिक ते ऍडव्हान्स कोर्सेस आपण महाविद्यालयातच सुरू करणार आहोत. ज्यासाठी मुलींना पुणे-मुंबईला जावे लागते, ते सर्व कोर्सेस सुरक्षित वातावरणात इथेच उपलब्ध करून दिले जातील.”
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. माया लहारे, प्रा. दिपाली झावरे आणि प्रा. प्रतीक्षा जाधव यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले.

