Site icon

शहरातील कचरा संकलन व रस्ते दुरुस्तीबाबत, वंचित बहुजन आघाडीचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर / भगवान गायकवाड

शहरातील कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आणि बंद गटार पाइपलाइनच्या कामांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका कराच्या स्वरूपात जनतेकडून कोट्यवधी रुपये वसूल करते, राज्य सरकारकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी १० ते १४ कोटी रुपयांचा निधीही मिळतो; तरीही शहरात नियमित कचरा संकलन होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे. राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार पालिकेला मिळाला तरी तो कोणत्या निकषांवर मिळाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बांधकाम खात्याच्या कामकाजाबाबतही नागरिक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट सोडण्यात आली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान होत आहे. बंद गटार पाइपलाइनची कामे केवळ वरवर झाकण बसविण्यापुरती मर्यादित असल्याचा आरोप होत असून आतील कामे अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमतामुळे निकृष्ट कामाला मंजुरी देऊन थेट बिल अदा केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे राज्य शासनाच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू असल्याचे चित्र दिसते.


अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फोटो लावण्याची मागणी करण्यात आली आहे.


वरील सर्व बाबी तातडीने निकाली न काढल्यास अहिल्यानगर महानगरपालिकेविरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहर अध्यक्ष हनीफ शेख,भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे,ॲड.योगेश गुंजाळ युवा शहराध्यक्ष,जिल्हा सल्लागार जे डी शिरसाठ,रविकिरण जाधव,फिरोज पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Share This News On
Exit mobile version