वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ शिक्षक व प्रगतिशील शेतकरी सुदाम मारुती रोकडे गुरुजी यांचे निधन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ शिक्षक, प्रगतिशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सुदाम मारुती रोकडे गुरुजी (वय 78) यांचे रविवारी, दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावाने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
सुदाम गुरुजी यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवले, तर शेतीतही त्यांनी प्रगतिशील दृष्टिकोन ठेवला. त्यांना शेतीची विशेष आवड होती, आणि त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले. दत्त सावताळ बाबा देवस्थानचे खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले. मंदिर परिसरात अनेक विकासकामांना चालना दिली. त्यांच्या कार्यकाळात मंदिराचा परिसर सुशोभित आणि समृद्ध झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी शशिकला सुदाम रोकडे, दोन मुले—सरपंच संजय सुदाम रोकडे आणि आदर्श शिक्षक सुनील सुदाम रोकडे, मुलगी सविता संजय लाकूडझोडे, दोन सुना, सहा नातवंडे आणि मोठा परिवार आहे. प्राध्यापक संजय लाकूडझोडे सर यांचे ते सासरे होते.
सुदाम रोकडे गुरुजींच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता वडगाव सावताळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सरपंच संजय रोकडे यांचा मोठा मित्र परिवार नातेवाईक हितचिंतक व गुरुजींचे विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या स्मृतीला अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक योगदान कायम स्मरणात राहील.

