पारनेर / भगवान गायकवाड,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित पारनेर दौऱ्याला होणारा ‘अजित पवार – गो – बॅक’ आंदोलन अखेर स्थगित करण्यात आला आहे. पारनेर साखर कारखान्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत येत्या ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयात बैठक आयोजित केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्यानिमित्त पारनेर दौऱ्यावर येत असताना, पारनेर कारखाना बचाव समिती आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेने त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तात्काळ हालचाल केली.
या प्रश्नी आमदार काशिनाथ दाते सर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मंत्रालयात या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकारमंत्री, आमदार काशिनाथ दाते सर, सहकार सचिव, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, राज्य सहकारी बँक, क्रांती शुगर कंपनी, कारखाना बचाव समिती आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
बैठकीचे लेखी पत्र प्राप्त होताच, दोन्ही संघटनांनी २ ऑक्टोबरचे नियोजित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि तसे पत्र पारनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सादर केले. यावेळी लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्यासह साहेबराव मोरे, संतोष वाबळे, मनोज तामखडे, रामदास सालके, प्रवीण खोडदे, वसंत साठे, सुभाष करंजुले, गोरक्ष पठारे, अन्सार पटेल, रघुनाथ मांडगे, बाळासाहेब वाळुंज, राहुल गुंड, प्रशांत औटी, सोमनाथ गोपाळे, अनिल सोबले, संभाजी सालके, अंकुश कोल्हे, रामदास सालके, गोविंद बडवे, बाबाजी वाढवणे, संजय भोर, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र पांढरकर, अरुण बेलकर, जालिंदर लंके, नंदन भोर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे आता पारनेर साखर कारखान्याच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

