पारनेर / भगवान गायकवाड,
दसरा सणाचे औचित्य साधून उद्या, गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी पारनेर येथे महायुतीच्या वतीने भव्य रोजगार व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बेरोजगार युवकांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर भूषवणार आहेत.
या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे, सुपा औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे वरीष्ठ अधिकारी व मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील पात्र बेरोजगार युवकांना थेट नोकरीच्या संधी मिळण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष सक्रिय आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, आर.पी.आय. आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्यासह राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, दूध संघाचे चेअरमन संदिप ठुबे, आदींसह महायुतीचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व बेरोजगार युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

