पारनेर / भगवान गायकवाड,
मराठी भाषेचा सन्मान आणि गौरवशाली वारसा टिकवण्यासाठी केवळ भूतकाळात न रमता वर्तमानात सक्रिय कृती करणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक प्रा. डॉ. विजय काळे यांनी केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पारनेर येथे ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

‘मराठी भाषेचा अभिजात दर्जा: वारसा, वास्तव आणि जबाबदारी’ या विषयावर बोलताना डॉ. काळे यांनी मराठीच्या अभिजाततेचे ऐतिहासिक पुरावे, (इसवी सन ९८३ मधील श्रवणबेळगोळ शिलालेख, संत साहित्य) प्रभावीपणे सादर केले. मात्र, इंग्रजीचे अतिक्रमण आणि डिजिटल माध्यमांतील उदासीनतेमुळे तरुण पिढी मायबोलीपासून दूर जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
वाचन संस्कृतीचा ऱ्हास थांबवून भाषेचे सौंदर्य टिकवण्यासाठी व्यवहारात, सोशल मीडियावर मराठीचा वापर आणि घरात मराठी पुस्तके आणणे यांसारख्या छोट्या कृती मोठा बदल घडवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीशी नाते घट्ट करण्याचे आवाहन केले. मराठी विभाग व कनिष्ठ विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरेश शेळके यांनी केले. उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.