Site icon

सैन्य दलात विकास करंजुले बनले नायब सुभेदार: पाडळी रांजणगावचा सुपुत्र नावारूपाला!


पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील सुपुत्र विकास (माऊली) शिवाजी करंजुले यांनी भारतीय सैन्य दलात ‘नायब सुभेदार’ या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती मिळवून गावचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल नुकताच गावी परतल्यावर डी.बी. (आण्णा) करंजुले मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. ब्रिटनिया डेअरीचे चेअरमन नितीन साठे आणि श्रीराम करंजुले यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.


विकास शिवाजी करंजुले (माऊली) हे गेल्या १३ वर्षांपासून भारतीय सैन्य दलातील ‘बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप’ मध्ये कार्यरत आहेत. आपल्या अंगभूत शौर्य गुणांमुळे त्यांनी केवळ देशसेवाच नाही, तर क्रीडा क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. विकास करंजुले यांनी आर्मी स्पोर्ट्समधील ‘रोईंग’ (Rowing) या खेळात राष्ट्रीय स्तरावर तब्बल ०५ सुवर्ण पदके मिळवली आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्र राज्य स्तरावर ०२ सुवर्ण पदके आणि आर्मी चॅम्पियनशिपमध्ये ०५ सुवर्ण पदके जिंकून एक अजोड कामगिरी केली आहे.


त्यांच्या या अतुलनीय शौर्य, निष्ठा आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळेच सैन्य दलाने त्यांची ‘नायब सुभेदार’ (Naib Subedar) या मानाच्या पदावर बढती करून त्यांना सन्मानित केले आहे. पाडळी रांजणगावच्या या सुपुत्राच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.


नायब सुभेदार विकास करंजुले यांच्या सत्कार समारंभास पाडळी येथील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सोसायटी चेअरमन डी.बी. करंजुले, माजी सरपंच आप्पासाहेब साठे, ब्रिटनिया डेअरी चेअरमन नितीन साठे, श्रीरामबापू करंजुले, शिवाजी करंजुले, वसंत जाधव, ताराचंद साठे, दत्तात्रय खेसे, सचिन साठे, सोनू साठे, अनिल अलभर, सुभाष खेसे, भाऊसाहेब उबाळे, अशोक साठे, आप्पा खेसे, सूर्यकांत करंजुले, दीपक साठे, तुषार साठे, अजित करंजुले, आदेश साठे, योगेश साठे, कांतिलाल साठे, ओम साठे, वैभव भालेकर आणि पत्रकार दीपक करंजुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नायब सुभेदार विकास करंजुले म्हणाले, “मोठ्या परिश्रमाने मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. शालेय विद्यार्थ्यांनीही यश मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सैन्यदलात देशसेवा बजावताना मिळालेले हे ‘नायब सुभेदारपद’ माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण गावासाठी अत्यंत भूषणावह आहे. गावातील अन्य तरुणांनीही सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
विकास करंजुले यांच्या या पदोन्नतीने पाडळी रांजणगाव येथील तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी क्रीडा आणि सैन्य दलात केलेल्या कामगिरीमुळे राज्याचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.

Advertisement
Share This News On
Exit mobile version