जामगाव येथे ५८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील जामगाव येथे शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते सर यांनी यावेळी केले. एकूण ५८ लक्ष रुपये खर्चाच्या या चार महत्त्वपूर्ण विकासकामांच्या माध्यमातून जामगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. पुष्पाताई बाळासाहेब माळी उपस्थित होत्या. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुभाषराव दुधाडे, प्रसाद मेहेर, दिनकर सोबले, राजेंद्र नाईक, मनोज शिंदे, बाळासाहेब सोबले, बाळासाहेब माळी, सरपंच साहेबा गुंजाळ, रोहीदास चौधरी, सिताराम खोडाळ, रोहीत शिंदे, किशोर चौधरी, स्वप्निल बर्वे, दत्तात्रय पवार, तुकाराम खाडे, रामभाऊ खाडे, बाबासाहेब बांगर, समीर मांढरे, गणेश बर्वे, विलास बर्वे, सुरेश चौधरी, सतिष चौधरी यांच्यासह जामगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून गावासाठी खालील चार महत्त्वाची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत:
१. गावांतर्गत मळगंगा माता मंदिर पटांगण कॉंक्रीटीकरण (१० लाख रुपये)
२. गुंजाळ वस्ती बैल टेक यमाई मंदिर सभामंडप (५ लाख रुपये)
३. जामगाव घाट ते डिकसळ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२५ लाख रुपये)
४. बांगरवाडी रस्ता ते चौधरी मळा ते अआमराई रस्ता मजबुतीकरण (१८ लाख रुपये)
या चार कामांसाठी एकूण ५८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, “मतदारसंघातील प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देणे, दळणवळणाचे प्रश्न मार्गी लावणे आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. जामगाव येथील या ५८ लक्ष रुपयांच्या विकासकामांच्या माध्यमातून गावातील रस्ते, धार्मिक स्थळे आणि नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि भविष्यातही जामगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ.”
उपस्थित मान्यवरांनी आमदार दाते सर यांच्या विकासाभिमुख कार्याचे आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्याच्या त्यांच्या तळमळीचे विशेष कौतुक केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जामगाव येथे झालेल्या या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि समाधानकारक वातावरणात पार पडला.