Headlines

चोंभूत गौतमनगर येथे साकारणार चैत्यभूमीच्या कमानीची भव्य प्रतिकृती

चोंभूत गौतमनगर येथील भव्य स्वागत कमानीसाठी रु. २० लाख मंजूर
ग्रा. सदस्य प्रणल भालेराव यांच्या पाठपुराव्याला मोठे यश;

पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळत असून, मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत” तब्बल दोन कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या संपूर्ण निधीतून चोंभूत ग्रामपंचायतीमधील गौतमनगर येथे भव्य स्वागत कमान उभारण्यासाठी २० लक्ष रुपये निधीला मंजुरी मिळाली असून, यामुळे गौतमनगर भागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे.


भालेराव यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
चोंभूत ग्राम. सदस्य प्रणल पोपट भालेराव यांनी गौतमनगर येथे एक भव्य आणि आकर्षक स्वागत कमान उभी करण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते सर यांच्याकडे केली होती. केवळ मागणी करून न थांबता, भालेराव यांनी या विकासकामासाठी वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा केला. आमदार दाते यांनीही या मागणीची दखल घेत आणि स्थानिकांना विकासाचा दिलेला शब्द पूर्ण करत, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत’ विशेष बाब म्हणून स्वागत कमानीसाठी २० लक्ष रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. गौतमनगरच्या प्रवेशद्वारावर लवकरच साकारणारी ही कमान केवळ एक वास्तू नसून, परिसराच्या वैभवात भर घालणारी एक ओळख ठरणार आहे.


या निधी मंजुरीच्या निमित्ताने आमदार काशिनाथ दाते सर यांनी बोलताना स्पष्ट केले की, आपण पारनेर तालुक्याचा विकास हा केवळ कागदोपत्री न ठेवता, तो सर्वांगीण स्वरूपात आणि मूलभूत सुविधा पुरवणारा असेल. “माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी आणि प्रत्येक वस्ती यांचा समतोल विकास साधण्यावर माझा भर आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या महत्त्वपूर्ण योजनेतून केवळ गौतमनगरच नव्हे, तर तालुक्यातील अनेक वंचित आणि दुर्लक्षित भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.


चैत्यभूमीच्या कमानीची संकल्पना….
दरम्यान, निधी मंजूर होताच ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी या स्वागत कमानीबद्दलचा आपला मानस व्यक्त केला आहे. गौतमनगर येथील ही स्वागत कमान भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी असावी, यासाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली आहे. या मंजूर निधीतून मुंबई येथील प्रेरणास्थान असलेल्या चैत्यभूमीच्या स्वागत कमानीची भव्य प्रतिकृती गौतमनगर येथे साकारण्याचा त्यांचा मानस आहे. ही कमान केवळ स्वागत कमान न राहता, ती समता, न्याय आणि प्रेरणेचे प्रतीक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आमदार दाते सर यांच्या या भरीव निधी मंजुरीबद्दल गणेश भालेराव, राजू भालेराव, संगम भालेराव, किसन गुंजाळ, स्वप्नील भालेराव, अजित भालेराव, विशाल भालेराव, सचिन भालेराव, दीपक भालेराव, संजय भालेराव, मंगेश भालेराव, अक्षय भालेराव, दगडू भालेराव, सागर सोनवणे, संकेत भालेराव, सनी भालेराव, संतोष भालेराव, निखिल भालेराव, योगेश भालेराव आणि परिसरातील सर्व नागरिकांनी आमदार काशिनाथ दाते सर यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि आमदारांची सकारात्मकता यातून चोंभूतच्या गौतमनगरचे रुपडे लवकरच पालटणार असून, इतर गावांमध्येही विकासाची लाट येण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *