Headlines

पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणूक स्वबळावर लढविणार – पातारे

पारनेर / भगवान गायकवाड,
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या  निवडणुका वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुक्यात स्वबळावर लढविणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे  यांनी केली आहे.


       या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब पातारे यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “वंचित बहुजन आघाडीचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही कुठल्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता या निवडणुका ताकदीने लढवणार आहोत. तळागाळातील सामान्य जनता, वंचित घटक आणि मागासलेल्या समाजाला न्याय मिळवून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून आमची राजकीय ताकद सिद्ध करू.”
पातारे पुढे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीने नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे दुःख बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांना आव्हान दिले आहे. पारनेर तालुक्यातही अनेक समस्या अजूनही तशाच आहेत, ज्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. त्यामुळे, सर्व जातीधर्माच्या आणि सर्व स्तरातील लोकांना आम्ही सोबत घेऊन ही लढाई लढणार आहोत.”


या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असून, लवकरच पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन सक्षम आणि समाजासाठी तळमळीने काम करू शकणाऱ्या व्यक्तींना संधी देण्यात येईल, असेही पातारे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीची तालुक्यात गाव पातळीवर आणि बूथ पातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
पातारे यांच्या या घोषणेमुळे पारनेरच्या स्थानिक राजकारणात आता प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी किती जागांवर विजय मिळवते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब पातारे यांनी केलेल्या या ‘स्वबळावर’च्या घोषणेमुळे पारनेर तालुक्यातील आगामी निवडणुका अधिक चुरशीच्या होणार हे निश्चित आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना पातारे यांनी दिल्या आहेत.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *