पारनेर / भगवान गायकवाड,
आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, पारनेर संचलित इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल (ANM/GNM) ने यावर्षीही आपला १००% निकालाचा दैदीप्यमान वारसा कायम राखत, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना यशाची नवी कमान गाठण्यास मदत केली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ANM व GNM अंतिम परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले, ज्यात स्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे संस्थापक डॉ. सादिक राजे यांनी ही माहिती दिली.
या यशस्वी वाटचालीत, ANM द्वितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेत ४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह तर ६ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. यात कु. श्रद्धा सुनील देठे (४८२/६००) हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. शोभा कंदास रसाळ (४८०/६००) द्वितीय, आणि कु. प्राजक्ता दत्तात्रय धस व कु. वंदना रामचंद्र गिऱ्हे (दोघी ४६२/६००) यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला.
त्याचप्रमाणे, GNM द्वितीय वर्ष परीक्षेमध्ये ४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह व ९ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. कु. पल्लवी चंद्रकांत बोरगे आणि कु. दिक्षा दीपक देठे (दोघी ५४६/८००) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. कु. संध्या रावसाहेब रेपाळे (५३४/८००) द्वितीय, तर कु. श्रद्धा गणेश जगदाळे (५२७/८००) तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झाली.
स्कूलने सलग वीस वर्षे १००% निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल डॉ. सादिक राजे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, या यशाने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी एक अत्यंत मजबूत आधार मिळाला आहे. स्थापनेपासून ते आजपर्यंत १००% विद्यार्थिनींना शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये नोकरी मिळाली असून, त्या त्यांच्या पायावर यशस्वीपणे उभ्या राहिल्या आहेत.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल प्राचार्या मनीषा पंडित, शिक्षिका पूनम खोसे, निकिता गजभिव, शिक्षक विशाल गजभिव आणि फिरोज शेख यांच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका राहिली. संस्थेचे संस्थापक डॉ. सादिक राजे आणि विश्वस्त फहाद राजे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



