जय मल्हार गणेश मित्र मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
निघोज / भगवान गायकवाड,
जय मल्हार गणेश मित्र मंडळ निघोज आयोजित श्रीगणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन निघोज गावचे माजी सरपंच श्री. ठकाराम लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी लहान मुले , गावातील ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटक श्री. ठकाराम लंके यांनी जय मल्हार गणेश मित्र मंडळाने आयोजित केलेल्या मनोरंजनात्मक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. जादूचे प्रयोग विज्ञान , हातचलाखी व मनोरंजनाचा सुरेख संगम आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भविष्यातील विधायक उपक्रमासाठी जय मल्हार मंडळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
जादूगार प्रकाश शिरोळे यांनी एकसरस जादूचे प्रयोग दाखवत कार्यक्रमातील उत्साह वाढवला. लहान मुले ग्रामस्थ यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कधी काठीतून फूल, कधी कानातून रुमाल असे प्रयोग पाहत असताना सभागृहात हास्याचे कारंजे उडत होते.
जय मल्हार गणेश मित्र मंडळातर्फे प्रा. श्री. सचिन लंके यांनी सर्वांचे आभार मानले. मंडळाच्या पदाधिकारी यांच्यामुळेच या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणे शक्य झाले असे मत त्यांनी व्यक्त केले.