पारनेर / भगवान गायकवाड,
महाविद्यालयात प्रेरणा व जागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील ‘रील स्टार’ बनण्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करून आयुष्यातील ‘रिअल स्टार’ बनावे. ज्या क्षेत्रात आवड आहे, तेच क्षेत्र करिअरसाठी निवडल्यास कामाचे समाधान मिळते आणि यश निश्चितच मिळते, असे मत डॉ. सायली खोडदे यांनी व्यक्त केले.
येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ‘प्रेरणा व जागृती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते.
पुढे बोलताना डॉ. खोडदे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी दररोज काहीतरी नवीन शिकले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला, तर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होऊ शकतो.”
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी विद्यार्थ्यांना थोर महिलांचे विचार आत्मसात करून जीवनातील ध्येय निश्चित करण्याचा संदेश दिला. ते म्हणाले, “सातत्य आणि चिकाटी ठेवून यशाच्या दिशेने वाटचाल केल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.”
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगर्डे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख, महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक डॉ. सरिता कुंडलीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका व प्रथम वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिक्षा तनपुरे यांनी केले. मुस्कान सय्यद व शिंदे ज्ञानेश्वरी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले, तर आभार प्रा. चैताली मते यांनी मानले.
आवडीचे क्षेत्र निवडा, यशस्वी व्हा; विद्यार्थ्यांना डॉ. सायली खोडदेंचा कानमंत्र”



