पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमीचे औचित्य साधून पारनेर शहरात एका महत्त्वपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २ रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य बुद्धरूप स्थापना समारंभ उत्साहात पार पडणार आहे.
या बुद्धरूपाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे बुद्धरूप आयुष्यमती विठाबाई गणपत ओव्हाळ (रा. गांजीभोयरे, ता. पारनेर) यांनी दान केले आहे. स्मृतीशेष राजू सोनवणे यांची कन्या, संजय रघुनाथ ओव्हाळ यांची चुलती आणि बाळू भाऊ पाडळे यांची बहीण असलेल्या विठाबाई ओव्हाळ यांनी आपल्या सम्यक अजीवेद्वारे (योग्य मार्गाने) मिळवलेल्या उत्पन्नातून हे बुद्धरूप संघाला दिले आहे.
या पवित्र समारंभात पूज्य भंते कश्यप यांच्या हस्ते सूत्रपठण आणि धम्मदेसना विधी पार पाडला जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र करंदीकर हे असणार आहेत. तसेच, शिवकांत शिंदे, बाळासाहेब सरवदे आणि पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ प्रमुख उपस्थितीमध्ये सहभागी होतील.
धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमीच्या या मंगलमय प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धरूप स्थापना समारंभास पारनेर तालुक्यातील सर्व उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.



