चार सुवर्णपदक व तीन रौप्य पदकावर कोरले नाव
पारनेर / भगवान गायकवाड,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व सांस्कृतिक विभाग आयोजित जल्लोष 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, लोणीकंद पुणे व राज्यस्तरीय अंतिम सांस्कृतिक स्पर्धा अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर या ठिकाणी एकूण सत्तावीस कला प्रकारांची स्पर्धा संपन्न झाली.

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पारनेर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, लोणीकंद येथे आयोजित केलेल्या ९०० विद्यार्थ्यांमधून वादविवाद स्पर्धा प्रथम क्रमांक, मूकनाट्य कलाप्रकार प्रथम क्रमांक, लोकनृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक तसेच भारतीय समूह गायन द्वितीय क्रमांक, वकृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक, लोकवाद्य स्पर्धा तृतीय क्रमांक मिळवून तीन सुवर्णपदक व तीन रोप्य पदकावर नाव कोरले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर येथे अंतिम राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहा कला प्रकारातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी सहभागी होता आले. सदर राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेत १,१३८ विद्यार्थ्यांमधून वादविवाद या स्पर्धेत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पारनेर येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाच्या यशात आणखी भर घातली. त्याबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य, डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य, डॉ. तुकाराम थोपटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, विद्यार्थी विकास अधिकारी, रवींद्र देशमुख, सांस्कृतिक अधिकारी, डॉ. हरेश शेळके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व समाजातील सर्वच क्षेत्रातून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्तरीय जल्लोष स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागातील प्रा. सफीया तांबोळी, डॉ. प्रवीण जाधव, प्रा. प्रांजल बोरुडे, प्रा. ज्ञानेश्वर गुलगे, प्रा. राहुल अमोलिक, प्रा. अनिकेत राऊत, प्रा. शुभांगी काळोखे, डॉ. प्रांजली भराटे, प्रा. पूजा शिंगोटे, प्रा. अनिल ढोले, प्रा. गणेश रेपाळे, प्रा. सीता काळे आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
कला गुणांना वाव तसेच व्यासपीठ उपलब्ध होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात. आपल्या कलांमध्ये पारंगत होतात. कौशल्य प्राप्त केलेले विद्यार्थी विविध ठिकाणी रोजगाराची संधी प्राप्त करतात. म्हणून महाविद्यालयात सातत्याने विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित उपक्रम घेतले जातात.



