शहाजापूर सार्वजनिक वाचनालयात प्रेरणा दिन उत्साहात साजरा
चेतक एंटरप्रायजेसकडून विद्यार्थ्यांना पुस्तके भेट
पारनेर / भगवान गायकवाड,
वाचनामुळे सुसंस्कृत पिढी तयार होते, जी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असते. उच्च शिक्षित अधिकारी आणि विविध क्षेत्रांत यशस्वी होणारे नेते घडतात, तसेच देशप्रेमी व सुजाण नागरिक निर्माण होतात. थोडक्यात, पुस्तकांच्या वाचनातून देशाच्या बळकटीसाठी मोठी मदत होते, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन चेतक एंटरप्रायजेसचे वरिष्ठ अभियंता सहित भडके यांनी केले. शहाजापूर येथील कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करताना ते बोलत होते.
भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. याच निमित्ताने पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चेतक एंटरप्रायजेसचे व्यवस्थापक शंकर खोसे, इंजिनियर सहित भडके आणि वरिष्ठ अधिकारी शंकर जस्वा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कंपनीच्या उपस्थित अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्याचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले. बोलताना सहित भडके यांनी वाचनालयाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, वाचनालयाच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीला देशाचे, जगाचे, विज्ञानाचे ज्ञान तसेच विविध क्षेत्रातील थोर व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांचे प्रतिबिंब रुपी दर्शन घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. पुस्तकांच्या वाचनातून सुजाण पिढी घडवली जात आहे, जी पुढे देश बळकट करण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.
दुर्गम भागातील खेड्यात ज्ञानसंपदेने परिपूर्ण असलेले कौडेश्वर सार्वजनिक वाचनालय पाहून व्यवस्थापक शंकर खोसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “शहाजापूरसारख्या ग्रामीण भागात असे दर्जेदार ग्रंथालय कार्यरत असणे ही खूप छान आणि प्रेरणादायी बाब आहे. या वाचनालयामुळे येथील विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, यात शंका नाही.”
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचे महत्त्व:
यावेळी बोलताना चेतक एंटरप्रायजेसचे व्यवस्थापक शंकर खोसे यांनी शिक्षणाच्या पद्धतीवर एक महत्त्वपूर्ण चौकट मांडली. ते म्हणाले की, विद्यार्थी जीवनासाठी आवश्यक असणारे पायाभूत आणि दर्जेदार शिक्षण हे आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच मिळते. आजकाल अनेक पालकांना आपल्या पाल्यांसाठी शिक्षण घेताना इंग्रजी खासगी शाळा हवी असते, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र नोकरी सरकारीच पाहिजे असते. या दुहेरी मानसिकतेमुळे जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व कमी होता कामा नये आणि या शाळांमध्ये मिळणाऱ्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
चेतक एंटरप्रायजेसने कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयास नेहमीच मदतीचा हात दिला आहे. यापूर्वीही कंपनीने वाचनालयास संगणक व पुस्तके भेट देऊन ग्रंथालयाच्या विकासात योगदान दिले आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहाजापूर जिल्हा परिषद शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना छोटी वाचनीय पुस्तके भेट देण्यात आली. कंपनीच्या अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना मिठाई खाऊ घालत दिपावलीपूर्वीच त्यांचे तोंड गोड केले आणि त्यांच्यातील वाचनवृत्तीला प्रोत्साहन दिले.
या प्रेरणादायी सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका हंडोरे मॅडम यांच्यासह शिक्षक किरण पवार सर आणि आकाश मोटे सर व शहाजापूर जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी, ग्रंथपाल सुरेंद्र शिंदे यांनी अधिकारी वर्गाचा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला आणि उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन ते देशाचे आदर्श नागरिक बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
देश बळकट करण्यात पुस्तकांचे मोठे योगदान – सहित भडके



