माहेरची साडी: प्रेमाची ऊब आणि जगण्याची आशा
पारनेर / भगवान गायकवाड,
देशातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता अत्याचारग्रस्त महिलांना त्वरित न्याय देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायमूर्ती कृष्णाजी सोनवणे यांनी केले.
तर, दिवाळीतील भाऊबीजेनिमित्त वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी ‘माहेरची साडी’ प्रेमाची ऊब आणि जगण्याची आशा देत असल्याचे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशज यांनी स्नेहालय संस्थेत केले.
देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. उमेश महाराज मोरे, अभंग प्रतिष्ठानचे संस्थापक विकास कंद आदींच्या प्रमुख उपस्थितीत २० वा “माहेरची साडी” हा उपक्रम स्नेहालय संस्थेत आज संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्या. सोनवणे यांनी भूषवले.
देह व्यापारातील बळी, मानसिक विकारग्रस्त, कष्टकरी, परित्यक्ता-विधवा आणि एकल अशा सुमारे ३५०० महिला आणि तृतीय लिंग पंथीयांशी यंदाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहृदय भावांनी बहिणीचे नाते जोडले. या मानलेल्या बहिणींना नवीन साडी, दिवाळीचा फराळ, आनंदाची शिदोरी भावांतर्फे देण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील देहू येथील अभंग प्रतिष्ठान, तळवडे येथील ज्ञानगंगा सोशल फाउंडेशन, देहूचे आत्मदीप फाउंडेशन, स्वातीज मेडीसर्च फाउंडेशन, या उपक्रमाची स्थापना करणारे समाजसेवक स्व. धर्मराज आवटी गुरुजी यांचा परिवार आणि स्नेहालय परिवाराने या उपक्रमासाठी साडी, फराळ इत्यादींचे संकलन केले.
‘जे का रंजले गांजले’
यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज उमेश महाराज मोरे म्हणाले की, कुटुंब आणि गाव सुटलेल्या एकल महिलांसाठी मदत देण्यापेक्षा त्यांच्याशी भावनेचे नाते जोडणे अनमोल आहे. माणसाच्या जगण्याचा आधार प्रेम आणि आपुलकीच असतो. माहेरच्या साडी उपक्रमातील साडीसोबत येणारा नात्यांचा बंध महिलांना जगण्याची नवी उमेद देणारा आहे.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे म्हणाले की, धर्मग्रंथ वाचून किंवा कर्मकांडातून कोणीही धार्मिक होत नाही. विचार आणि वर्तनातून माणुसकी व्यक्त होणे आणि ‘सारे भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे उमगणे, हेच धार्मिकतेचे अस्सल प्रमाण आहे.
स्नेहालय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जया जोगदंड यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, दोन दशकांपूर्वी निवृत्त शिक्षक धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी हा उपक्रम सुरू केला. दीड वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले, परंतु अनेक संस्थांनी एकत्र येऊन हा वारसा टिकवला.
अभंग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास कंद म्हणाले की, ज्ञानेश्वर आणि तुकारामांसह सर्व संतांनी वंचितांचे दुःख वाटून घेण्यालाच खरे धर्म आणि अध्यात्म मानले. माहेरची साडी उपक्रमात देहू परिसरातील ३५०० हून अधिक भावांनी वस्त्र सहयोग दिला. माहेर हरवलेल्या बहिणींना त्यामुळे मनाला उभारी देणारे गणगोत मिळाले.
यावेळी रंजना रणनवरे, जया जोगदंड, शोभा रोठे आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्त केल्या. माहेरची साडी केवळ वस्त्र नसून जगण्याची उमेद आणि आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात मयूर मोरे, डॉ. स्वाती आजबे, अनिकेत काळोखे, मळूराज धर्मराज औटी, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश लक्ष्मण खाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ॲड. भक्ती शिरसाठ यांच्यासह देहू येथील अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती रानडे यांनी केले.
नगर जिल्ह्यातील सर्व एकल अत्याचारित महिलांचा शोध घेण्यासाठी दीपक बुरम, प्रविण बुरम, अंबादास शिंदे, मजहर खान, मुस्ताक पठाण, विशाल कापसे, अजय वाकडे, सविता कारंडे, मीना पाठक, आशा डोईफोडे, वनमाला कराळे यांनी विशेष परिश्रम घेतले.



