पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरातील बसस्थानक चौकात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह गेली कित्येक दिवस बंद अवस्थेत असून, यामुळे पारनेर शहरासह तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या स्वच्छतागृहांकडे नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात विविध कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ही सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत आवश्यक आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही स्वच्छतागृहे बंद असल्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच बाजार तळावर असलेल्या स्वच्छता गृहाचीही दुरावस्था झाली आहे.या ठिकाणी स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले आहेत, तसेच नियमित साफसफाईचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, आता देखभालीअभावी ती केवळ शोभेची वस्तू बनली आहे. या बंद स्वच्छतागृहांमुळे नागरिकांना नाइलाजाने उघड्यावर लघुशंका करावी लागत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे आणि ही सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने दुरुस्त करून नागरिकांच्या वापरासाठी खुली करावीत, अशी मागणी आता पारनेरमधील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा, नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या विषयावर नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी नागरिकांची स्वच्छता गृहाची असुविधा लक्षात घेऊन तातडीने स्वच्छतागृह सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत.
पारनेर नगरपंचायतचे मध्यवर्ती ठिकाणचे स्वच्छतागृह बंद अवस्थेत, नागरिकांची गैरसोय



