मांडवे खुर्द शाळेचा अनोखा उपक्रम: पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात
सीईओ आनंद भंडारी यांच्याकडे पूरग्रस्तांसाठीचा निधी सुपूर्त
पारनेर/प्रतिनिधी :
दिवाळीचा खरा अर्थ फक्त दिव्यांच्या प्रकाशात नाही, तर इतरांच्या जीवनात आनंदाचा उजेड पसरवण्यात आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान. आनंद भंडारी यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे खुर्द येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागवणारा अनोखा उपक्रम राबवला. दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या रंगीत पणत्या, आकाशकंदील, रांगोळी साहित्य आणि पूजेच्या वस्तूंची विक्री गावच्या आठवडे बाजारात केली. या विक्रीतून जमा झालेली १०,५५०/- रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून सुपूर्द करण्यात आली. ही रक्कम मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली.
भंडारी म्हणाले, विद्यार्थ्यांची ही संवेदनशीलता सामाजिक जाणीवेचा खरा आदर्श आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना स्वतः बनवलेला पंचदीप आणि हँडमेड ग्रीटिंग भेट देऊन आपले कौशल्य दाखवले. या उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृती आणि शिक्षकांचे कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, सरपंच सोमनाथ आहेर, ग्रामपंचायत सदस्य गौतम बागुल, रेवणनाथ गागरे, कैलास आहेर, मुख्याध्यापक बाबाजी ढोकळे, शिक्षक प्रितम बर्वे, बाळासाहेब खराबी, झावरे, पायमोडे, शिरसाट मॅडम, गाडे सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांनी केवळ दिवे नव्हे, तर मानवतेचा उजेड सर्वांच्या मनात पसरवला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे खुर्द नेहमीच स्पर्धा परीक्षांमधील उल्लेखनीय यशाबरोबर सामाजिक जबाबदारीही जपते.
या वेळी विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना दिलेली मदत ही सामाजिक जाणीवेचा आदर्श नमुना आहे.
इतर शाळांनीही या उपक्रमाचे अनुकरण करून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना जागवावी,
असे आवाहन जिल्हा शिक्षण अधिकारी, अहिल्यानगर — मान. भास्कर पाटील साहेब यांनी केले.



