पारनेर / भगवान गायकवाड,
रुग्ण, ग्राहक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांच्या हिताचा समतोल राखणारा, पारदर्शक व प्रभावी वैद्यकीय कायदा मंजूर करावा, असा ठराव अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांत आयोजित प्रांतस्तरीय निवासी अभ्यासवर्गाच्या समारोप समारंभात एकमताने मंजूर करण्यात आला.
श्री विघ्नहर गणपती देवस्थान मंडळाच्या भक्त भवन, ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे दोन दिवस चाललेल्या या अभ्यासवर्गाचा समारोप रविवारी झाला.
🔹 ठराव व मार्गदर्शन
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि संपर्क अधिकारी सूर्यकांतजी पाठक होते.

समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक आयोगाचे मा. लोकपाल ॲड. प्रकाश लाड, प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी , राज्य वीज नियामक आयोगाचे सचिव दिलीप डूंबरे, प्रांत संघटन मंत्री संदीप जंगम, प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे, सह-कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार झेंडे-पाटील, जिल्हा सचिव अशोक भोर, जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी “रुग्णांचे हक्क आणि कर्तव्य” या विषयावर मार्गदर्शन करताना महाराष्ट्र शासनाने ७ मार्च २०२५ रोजी विधानसभेत सादर केलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना अधिनियम २०२५ च्या अध्यादेशातील त्रुटींवर सखोल चर्चा केली. त्यांनी या कायद्यात सुधारणा करून रुग्ण, ग्राहक व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांचा समतोल राखणारा अधिनियम मंजूर करण्याची गरज अधोरेखित केली.
🔹 वैद्यकीय कायद्यावरील प्रमुख मागण्या
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताने प्रशासनास पुढील मागण्या सादर केल्या —
1. विधेयकातील सर्व त्रुटी दूर करून सुधारित, रुग्णकेंद्री व समतोल राखणारा अधिनियम मंजूर करावा.
2. विधेयकाच्या मसूदा समितीत ग्राहक प्रतिनिधी, कायदा तज्ञ व समाजसेवी संस्थांचा समावेश करावा.
3. वैद्यकीय आस्थापना, रुग्णालये व प्रयोगशाळांवरील नियंत्रणासाठी स्वायत्त वैद्यकीय आस्थापना नियामक प्राधिकरण स्थापन करावे.
4. प्रत्येक वैद्यकीय आस्थापनात दरपत्रकांचे सार्वजनिक प्रदर्शन अनिवार्य करावे.
5. अधिनियमाची अंमलबजावणी करताना ग्रामीण भागातील लहान दवाखाने व डॉक्टरांना अडचण न आणता सहकार्याची भूमिका घ्यावी
🔹 पुस्तक प्रकाशन सोहळा
या समारोप कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी लेखन केलेल्या
📘 “सविनय लढ्याची फलश्रुती आणि ग्राहक संरक्षण कायदा”
या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांतजी पाठक, मा. लोकपाल ॲड. प्रकाश लाड, सचिव दिलीप डूंबरे आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या पुस्तकात औटी यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास, लोकशाही संघर्षातील योगदान आणि जनजागृतीची व्याप्ती यांचा सखोल आढावा घेतला आहे. उपस्थित मान्यवरांनी या ग्रंथाचे प्रकाशन हे चळवळीच्या सातत्यपूर्ण कार्याचे फलित असल्याचे मत व्यक्त केले
🔹 अध्यक्षीय भाषण
अध्यक्षीय भाषणात सूर्यकांत पाठक म्हणाले,
“संघटना ही सिद्धांत, कार्यपद्धती आणि शिस्त या तीन सूत्रांवर चालते. कार्यकर्त्यांकडे कायद्याचे ज्ञान आणि संघटनेची तत्त्वनिष्ठ बांधिलकी असणे आवश्यक आहे. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असते; पण संघटनेत कार्यकर्त्यांना योग्य मान मिळालाच पाहिजे. संघर्षशील, नीतिमूल्य जपणारे आणि दीर्घकाल कार्य करणारे कार्यकर्ते घडविणे हीच खरी साधना आहे.”
🔹 इतर मार्गदर्शन सत्रे
मा. प्रसाद लाड (माजी लोकपाल, वीज महावितरण कंपनी) यांनी ग्राहकांसाठी विनामूल्य सल्ला सेवा देण्याचे आश्वासन दिले.
संदीप जंगम यांनी “पंच परिवर्तन” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सोशल मीडियावर ग्राहक कार्य या विषयावर प्रबोधन केले.
अभ्यासवर्गाचे सूत्रसंचालन दिपक इरकल यांनी केले, तर ज्ञानेश्वर उंडे यांनी आभार मानले
🔹 उपस्थिती व आयोजन
या अभ्यासवर्गात पुणे महानगर, कोल्हापूर, नंदुरबार, सांगली, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, नाशिक आदी भागांतील निवडक प्रांत आणि जिल्हा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. तुषार झेंडे-पाटील, अशोक भोर, जगन्नाथ खोकराळे, देवराम शेठ तट्टू, देविदास काळे, संजय चिंचपूरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.



