महिला व बालविकास विभागाचा उपक्रम / माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.
पारनेर / भगवान गायकवाड,
काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या कार्यात मागील तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या ‘स्नेहालय’ सामाजिक विश्वस्त संस्था आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. संस्थेच्या विविध प्रकल्पातून सेवांचा लाभ घेऊन समाजात पुनर्वसित झालेल्या सुमारे 5,000 माजी विद्यार्थ्यांना दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने ‘स्नेहालय’ संस्थेत – म्हणजेच त्यांच्या कुटुंबात – निमंत्रित केले जाते. यंदाही या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालयाचे मुख्य पालक उद्योजक मिलींद कुलकर्णी उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अनिल गावडे सर होते.
‘स्नेहालय’ म्हणजे ‘अनाथांचे पर्यायी कुटुंब’
उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. मिलींद कुलकर्णी यांनी “अनाथांचे खरे कुटुंब म्हणजे स्नेहालय” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले. समाज व्यवस्थेत ‘कुटुंब’ हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्राथमिक घटक असून समाजाचे अस्तित्व याच घटकावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
मानवी बालकाचा परावलंबन कालावधी इतर प्राण्यांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे बालकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी कुटुंबाकडेच असते. म्हणूनच अनाथांचे कुटुंब म्हणून ‘स्नेहालय’ संस्थेचे विशेष महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीचे जीवन कुटुंबात व्यतीत होते. संस्कृतीच्या हस्तांतरणातही कुटुंबाची मोठी भूमिका असल्याने कुटुंब संस्थेला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्नेहालय संस्थेने घेतल्याने, ‘स्नेहालय’ हेच या मुलांसाठी पर्यायी कुटुंब ठरले आहे.

स्नेहबंध प्रकल्पाचा आधार….
संस्थेत असताना ज्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्य झाले आहे आणि जी मुले सध्या समाजात स्थिर आहेत, त्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ‘स्नेहालय’ संस्थेचा ‘स्नेहबंध’ प्रकल्प कार्यरत आहे. मुलांनी आपल्या समस्या समाजमान्य पद्धतीने ‘स्नेहबंध’ प्रकल्पाच्या मदतीने सोडवाव्यात, असे आवाहन मा. मिलींद कुलकर्णी यांनी यावेळी केले.

आरोग्य, नियोजन आणि सन्मान….
अध्यक्षीय भाषणात स्नेहालय संस्थेचे मा. अनिल गावडे सरांनी विशेष घटकातील मुलांना मार्गदर्शन केले. यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी, एआरटी औषधांचे महत्त्व, समाजात वावरत असताना घ्यावयाची काळजी, आर्थिक नियोजन (काय व कसे करावे), अनाथ प्रमाणपत्रांचा उपयोग, शिक्षणाचे महत्त्व, आवश्यक कागदपत्रे आणि महिलांचा सन्मान का आवश्यक आहे, यांसारख्या विषयांवर त्यांनी विविध उदाहरणांद्वारे समवयस्क गटातील मुला-मुलींना समजावून सांगितले.
कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा गायकवाड यांनी केले, तर रेखा पाथरकर आणि एफ.बी.सी. प्रकल्पाचे सागर भिंगारदिवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



