लोणी मावळा उपकेंद्रातील 5 मेगावॅट सोलर प्रकल्प कार्यान्वित
पारनेर / भगवान गायकवाड,
लोणी मावळा उपकेंद्रात 5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प आजपासून कार्यान्वित करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सबंधित उपकेंद्रांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना आता रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत दिवसा अखंड वीजपुरवठा केला जाणार असल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे पाहिलेले स्वप्न यानिमित्ताने साकार होणार असल्याचे मत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे.
या उपक्रमाचा थेट लाभ लोणी मावळा, रांधे, दरोडी, गारखिंडी या गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना तसेच पाबळ, वाजेवाडी व नरसाळेवाडीच्या काही भागातील शेतकऱ्यांना होणार असून, लवकरच म्हसोबा झाप, टाकळी ढोकेश्वर, जवळा, निघोज व खडकवाडी आदी गावांत सौरऊर्जा प्रकल्पांची प्रगतीपथावर असलेली कामे पूर्णत्वास जाऊन त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांनाही अखंडितपणे दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल. दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी बिबट्या वा तत्सम जंगली श्वापदांच्या हल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमधून मोठा दिलासा मिळणार असून बळीराजावरील संकटावर पर्याय शोधण्यात यश आल्याचे मनस्वी समाधान असल्याचेही आमदार दाते यांनी यावेळी सांगितले.
सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषी पंप चालवायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी मतदारसंघात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतक-यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच ग्रामीण भागातील उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पारनेर तालुक्यातील ऊर्जाक्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाली असून, शाश्वत शेतीकडे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यापैकी 5 मेगावॅट क्षमतेचा राळेगणसिद्धी नंतर पारनेर तालुक्यात सौरऊर्जेवर चालणारा हा पहिलाच प्रकल्प असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि ऊर्जेच्या बचतीसाठी मतदारसंघात ह्या पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येत असून पुढील काळात त्यावर अधिकाधिक भर दिला जाणार आहे. सौरऊर्जेचा वापर करून दिवसा वीजपुरवठा हा तालुक्यातील शेती विकासासाठी आदर्श उपक्रम ठरणार असून यानिमित्ताने कृषी क्रांतीच्या वाटचालीला दिशा देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे.
आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा मिळणार : आमदार काशिनाथ दाते सर



